
शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत लोकजागृतीला महत्वाचे स्थान आहे. लोकाभिमुख शासन व्यवस्थेचा कणा असलेल्या सामान्य नागरिकांना शासन आपल्यासाठी काय करते हे थेट त्यांच्यात मिसळून सांगितले तर शासनाप्रती त्यांची विश्वासार्हता वाढते. शासन नेहमीच लोककल्याणकारी योजना राबवित असते. परंतु त्या ज्यांच्यासाठी आहेत त्यांच्यापर्यत थेट पोहोचत नाहीत असा नकारात्मक सूर ऐकायला मिळतो. हाच दृष्टिकोन सकारात्मक बनविण्यासाठी शासनासोबतच बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याच्या प्रशासनाची सामाजिक बांधिलकी विकासासाठी महत्वपूर्ण ठरते आहे.
चिखली येथील तहसिलदार प्रा. संजय खडसे यांनी चिखली तालुक्यासाठी अनेक महत्वपूर्ण व लोकाभिमुक उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांना नागरिकांनी प्रतिसाद तर दिलाच आहे, त्याचबरोबर त्यांचा शासनाप्रती विश्वासही वृध्दिंगत झाला. विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र, वन हक्काचे पट्टे वाटप, नागरिकांची सनद, पारधी जमातींना पाड्यावर जाऊन रेशनकार्ड देणे, अनाथ मुलांना शोधून त्यांना योजनांचा फायदा देणे, तलाठ्यांना लॅपटॉप देणे अशा वैशिष्ट्यपूर्ण योजना तालुक्यात राबविण्यात आल्या आहेत. तसेच शैक्षणिक क्षेत्रात प्रत्येक विद्यार्थ्यास जात प्रमाणपत्र, आधिवास दाखला व लोकराज्य हा त्रिसुत्री कार्यक्रम आखण्यात आला आहे.
दहावी, बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी जात प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार आहे, त्यासाठीचे नियोजन चिखली तहसिल कार्यालयाने वर्षभरापूर्वीच केले आहे. विद्यार्थ्यांना थेट शाळेतच जात प्रमाणपत्र देण्याचा अभिनव उपक्रम येथे राबविण्यात आला आहे. त्याअंतर्गत १८०० विद्यार्थ्यांना जानेवारी २०१० पर्यंत जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रासाठी भटकावे लागणार नाही. हिच मोहीम यावर्षी ऑगस्टपासून राबविण्यात येणार असून यावेळी एकही विद्यार्थी जात प्रमाणपत्राशिवाय राहणार नाही याचे नियोजन करण्यात आले आहे.
तहसिल कार्यालयामध्ये येणार्या नागरिकांना कोणत्याही कामासाठी त्रास सहन करावा लागू नये यासाठी नागरिकांची सनद तयार करण्यात आली आहे. वरवर पाहता ही केवळ पुस्तिका वाटत असली तरी या सनदेच्या माध्यमातून तहसिल कार्यालयच नागरिकांपर्यंत नेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. तहसिल कार्यालयात नागरिक दररोज आपल्या अनेक कामांसाठी येत असतात. साध्या-साध्या कागदपत्रांसाठी नागरिकांना अनेक टेबलांवर चकरा माराव्या लागतात. एवढे करुणही काम होईलच याची शाश्वती नसते. ही बाब तहसिदार श्री. खडसे यांनी वर्षभर अभ्यासली व त्यातूनच नागरीकांची सनद निर्माण झाली. या सनदीमुळे नागरिक व तहसिल कार्यालय यातील अंतर खुप कमी झाले आहे.
वारंवार भटकंतीवर असणार्या पारधी जमातींना सोयी-सवलती पुरवाव्या हे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार तहसिलदार खडसे यांनी १०१ पारधी बांधवांना रेशनकार्ड बनवून दिले. त्याचबरोबर तालुक्यातील अनाथ मुलांचा शोध घेऊन त्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. आता त्यांच्या शिक्षणाची व वसतिगृह प्रवेशाची जबाबदारीही खडसे यांनी स्वीकारली आहे.
नागरिकांना त्यांची कागदपत्रे बिनचूक व वेळेत मिळण्यासाठी खडसे यांनी तलाठ्यांना लॅपटॉप दिलेत. यामुळे महसूल विभागाच्या कामकाजाला गती प्राप्त झाली. प्रायोगिक तत्त्वावर १६ तलाठ्यांना लॅपटॉप दिले असले तरी लवकरच जिल्ह्यातील सगळे तलाठी आपले कामकाज लॅपटॉपवरच करतील यावर त्यांनी भर दिला आहे. जात प्रमाणपत्र, अधिवास दाखला व लोकराज्य ही त्रिसुत्री तहसील कार्यालयाने तयार केली असून पुढील दोन महिन्यांत यासाठी प्रत्येक शाळा, महाविद्यालयात हा कार्यक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. नागरिकांप्रती सामाजिक बांधिलकी ठेवल्यास प्रशासकीय कामकाज कौतुकास्पद ठरते ही बाब या उपक्रमांवरुन दिसून येते.
रवि गिते
