परवा बुलढाण्याला एका कार्यक्रमासाठी गेले होते. आमचे बुलढाण्याचे उत्साही जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते म्हणाले, आपण बुलढाण्यामध्ये एक लोकराज्य शाळा केली आहे. त्या शाळेला भेट देऊ या का? मी म्हटलं हो, नक्कीच, मीही या शाळेबद्दल खूप ऐकलं आहे. चला जाऊ या! बुलढाण्यातल्या कोलवड येथील विद्याविकास शाळेत आम्ही सकाळी पोहोचलो. शाळेचा मोठा हॉल आहे. या हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वच्छ गणवेशात ५ वी ते १० वी ची मुलं-मुली बसलेली होती. वातावरण अतिशय उत्साही होते. शाळेचे अध्यक्ष सुभाषराव पाटील यांनी आमचे स्वागत केले. माझ्या बरोबर नवाकाळच्या संपादक श्रीमती जयश्री खाडीलकर होत्या. अमरावती विभागाचे उपसंचालक बी. एन. गवारी हेही आले होते. शाळेचे मुख्याध्यापक सुनील जवंजाळ हिरीरीने माहिती देत होते. या शाळेत ऑडिओ व्हिडिओ व्यवस्था आहे. महत्वाचे विषय शिकविताना या माध्यमाचा वापर केला जातो. या शाळेत ८५० विद्यार्थी आहेत. शाळेच्या व्यवस्थापनाशी चर्चा करुन रवी गितेंनी सर्व विद्यार्थ्यांना लोकराज्यचे वर्गणीदार केले. घरोघरी लोकराज्य या मोहिमेत अधिकाधिक वर्गणीदार करण्यासाठी आम्ही सर्वच जण प्रयत्नशील असतो. लोकराज्यमधल्या माहितीचा सर्वात जास्त उपयोग स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणार्या विद्यार्थ्यांना होतो. कुठल्याही स्पर्धा परीक्षेत शासनाच्या योजनांविषयी प्रश्न असतोच आणि त्या सर्व योजनांची माहिती फक्त लोकराज्यमध्ये असते. मला या शाळेचे फार कौतुक वाटते. विद्यार्थी घडवितांना फक्त घोकंपट्टी न करता त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल हे या शाळेत कटाक्षाने बघितले जाते. लोकराज्यचे अंक मुले वाचतात की नाही यावर शाळेत वर्षातून २ वेळा परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजे फक्त वर्गणीदार करणे हेच उद्दिष्ट नाही तर मुले अंक वाचतात का नाही याकडेही बघितले जाते. मी यावेळी मुलांना एक गोष्ट सांगितली. इंग्लंडमध्ये माझे एक स्नेही गेले होते. त्यांच्याकडून तिथल्या वाचनालयाचे एक पुस्तक हरवले. त्यांनी पुस्तकाची रक्कम वाचनालयाला देऊ केली. ग्रंथपाल म्हणाले, पुस्तक हरवले म्हणजे नेमके काय झाले? त्यावर ते म्हणाले, माझे पुस्तक प्रवासात चोरी गेले. बॅग चोरी गेली त्यात पुस्तक होते. ग्रंथपाल म्हणाले, आमच्या देशात जर कोणाला कुठल्याही वाचनालयाचे पुस्तक सापडले तर ते तो परत करतो. कुणीही आपल्याकडे वाचनालयाचे पुस्तक ठेवत नाही. माझ्या स्नेह्याचा यावर विश्वास बसला नाही. ग्रंथपाल म्हणाले, आठ दिवस वाट बघू या. तिसर्या दिवशी सकाळी ग्रंथपालांचा फोन आला की, पुस्तक परत आलेले आहे. मुलांनी वाचनावर प्रेम करावे आणि पुस्तकेही नीट वापरावीत. वाचनालयाची पुस्तके वेळेवर परत करावीत असा संस्कार माझ्या मनावर झाला. तो मी त्यांना सांगितला. रवी गिते यांच्यासारखे जिल्हा माहिती अधिकारी वेगळ्या प्रकारचे काम करतात आणि लोकराज्य वर्गणीदार वाढवित असतानाच नव्या पिढीवर संस्कारही करतात याचा मला विलक्षण आनंद होतो.
श्रद्धा बेलसरे-खारकर
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment