
17 एप्रिल ची सकाळ वेळ ७ ची.. बुलडाणा जिल्हयातील विद्या विकास विद्यालय कोलवडच्या हिरवळीवर सगळे विद्यार्थी स्वच्छ गणवेशात हजर.. हातात पॅड व कंपास . . .. मुख्याध्यापक सुचना देत होते.. दीड तासाचा पेपर आहे. सर्व प्रश्न सोडवा.. अक्षर सुवाच्च काढा.. खोडतोड करु नका.. आणि सर्वात महत्वाच म्हणजे परीक्षा संपल्यानंतर प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक घरी न्या. ती जपून ठेवा आणि पुढील परिक्षेची तयारी करा.. निमित्त होते लोकराज्य सामान्य ज्ञान परीक्षेचेहे सगळ माझ्यासाठी नवीन तर होतच, त्याही पेक्षा अप्रुप वाटाव असच होत. परीक्षा म्हटल की विद्यार्थ्याच्या अंगावर काटा येतो पण महाराष्ट्रातील पहिल्या लोकराज्य शाळेने लोकराज्यवर आधारित सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करताच विद्यार्थी आनंदाने व स्वयंप्रेरणेने परिक्षेत सहभागी झाले. शाळेच्याच नाही तर लोकराज्यच्या इतिहासात ही अनोखी परिक्षा ठरावी. या शाळेतील ७०० विद्यार्थी लोकराज्यचे वर्गणीदार आहेत. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून अवांतर वाचणाची सवय लागावी व त्यांच्या बालवयापासून स्पर्धा परिक्षेचे संस्कार व्हावे हा या मागाचा हेतू आहे. विद्यार्थ्यांना केवळ वर्गणीदार करुन ही शाळा थांबली नाही तर विद्यार्थी लोकराज्य वाचतात का ? वाचतात तर जपून ठेवतात का ? याचा शोध घेण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुनील जवंजाळ यांनी दर तीन महिन्याला लोकराज्य अंकावर आधारित परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि या मोहिमेची पाहिली परीक्षा १७ एप्रिल २०१० रोजी घेण्यात आली. वरवर पाहता ही केवळ परीक्षा असली तरी विद्यार्थ्यांवर स्पर्धा परीक्षेचे संस्कार करण्याचा हा अभिनव असा उपक्रम आहे. स्पर्धा परीक्षेत मराठी टक्का वाढावा यासाठी शासन स्वत: पुढाकार घेत आहे. त्यासोबत लोकराज्यने प्रेरणा मंच स्थापन करुन स्पर्धा परीक्षा देणार्यांना प्रोत्साहन देण्याचे काम जबाबदारी समजून केले आहे. त्याच लोकराज्यवर आधारित ही परीक्षा घेण्याचा कोलवड शाळेचा उपक्रम म्हणजे नव्या पिढीवर प्रशासकीय संस्कार करणे असाच म्हणावा लागेल. मुख्याध्यापक व त्यांच्या सहकार्यांनी यासाठी ७५ गुणांची प्रश्नावली तयार केली होती. या प्रश्नावलीवर नजर टाकल्यास शालेय मुले एमपीएससीचा पेपर सोडवत असल्याचे जाणवते. नोव्हेबर २००९ ते मार्च २०१० या महिन्याच्या लोकराज्य अंकावर आधारित ७५ प्रश्न होते. पेपरला दीड तासाचा वेळ दिला असला तरी विद्यार्थ्यांनी तो केवळ ४५ मिनिटात सोडविला यावरुन विद्यार्थ्यांनी किती छान तयारी केली याची अनूभूती यावी. ही एकच परीक्षा घेऊन आम्ही थांबणार नाही तर दर तीन महिन्याला ही परीक्षा घेण्यात येणार असल्याचे शाळा व्यवस्थापकाने जाहिर केले. त्यामुळे विद्यार्थी जेव्हा १२ वी पास होवून बाहेर पडतील तेव्हा त्यांचेकडे लोकराज्यचे ८४अंक व १६०० प्रश्न इतका मोठा ठेवा असणार आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी शाळेतच झाली असल्याने त्यांना कुठलेही आव्हान पेलने कठीण जाणार नाही. यावर या शाळेच्या विद्यार्थीनी प्रियंका जाधव व कविता रिंढे यांच्या प्रतिक्रिया अत्यंत समर्पक आहे. ४५ लाख वाचक असलेले लोकराज्य शासनाच्या योजना व ध्येय धोरणांसोबतच स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त मार्गदर्शक आहे. आपली शाळा लोकराज्य शाळा असल्याचा अभिमान व्यक्त करुन आम्ही लोकराज्यच्या प्रत्येक परिक्षेत भरीव यश संपादन करु.लोकराज्य आम्हाला स्पर्धा परिक्षेचे दालन उघडून देत असल्याचा मनस्वी आनंद त्यांनी व्यक्त केला. मुलांमध्ये हा आशावाद लोकराज्यने निर्माण केला ही या उपक्रमाची अतिशय जमेची बाजू म्हणावी लागेल. एरवी परिक्षेचे टेंशन घेणारे विद्यार्थी लोकराज्य परिक्षेला मोठ्या उत्साहाने सामोरे गेले. त्यांचा अभ्यास व आनंद विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरुन ओसंडून वाहत होता. परिक्षा संपल्यावरही पुष्कळ वेळ विद्यार्थी शाळेच्या परिसरात घुटमळत होते. लोकराज्यचे अंक चाळून आपण लिहलेल्या उत्तराशी ताळमेळ लावत होते. त्यामुळे शाळेचा संपूर्ण परिसर लोकराज्यमय झाल्याचे वाटत होते. विद्या विकास विद्यालय ही नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारी शाळा आहे. विद्यार्थ्यांनी केलेला वृक्षसवर्धनाची गुणपत्रिकेवर नोंद घेणारी ही एकमेव शाळा असावी. शासनाचे ब्रॅन्ड म्हणून लोकराज्यकडे पाहिले जाते. या ब्रॅन्डचे प्रमोशन व्हावे व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने सुरु करण्यात आलेल्या परिक्षेत प्रथम येणार्या विद्यार्थ्यास जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने एक हजार रुपयाचे परितोषिक देण्यात येणार आहे तर अनिल पळसकर व विजय इंगळे यांचेकडून ५०० व ३०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.विद्यार्थ्यावर वाचणाचे व परिक्षेचे सुसंस्कार करणार्या विद्या विकास विद्यालयातील विद्यार्थी खर्या अर्थाने लोकराज्यचे प्रमोटरच आहेत. या अनोख्या व अभिनव परिक्षेच्या मंत्रमुग्न वातावरणातून बाहेर पडू नये असेच वाटत होते. शाळांनी स्वस्फूर्तपणे हा उपक्रम राबविल्यास शाळेल जिवनापासूनच विद्यार्थ्यावर स्पर्धा परिक्षेचे संस्कार होतील हे निश्चित.
रवि गिते
रवि गिते
