बोथा जंगलात भटंकतीला जाऊयात का अशी विचारणा करणारा दूरध्वनी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांचा आला. रविवार असल्यामुळे तात्काळ हो म्हणालो. सोबत किटक संशोधक प्रा.अलोक शेवडे आहेत, अशी पृष्टी त्यांनी जोडताच किटक संशोधनात दिवस व्यतीत होणार याची कल्पना आली. वनभ्रमंती किती सुखावह असते याचा पहिल्यांदा अनुभव घेतला. छान घनदाट हिरव्यागार वनश्रींनी नटलेले, काट्याकुट्यात, दगडधोंड्यात, वेड्यावाकड्या पाऊलवाटात हरवलेलं, गवत फुलांनी, लता-वेलींनी गजबजलेलं अस जंगल पाहलं की, आठवण होते ती वन्य प्राण्यांची. पण त्याहीपेक्षा किटकांचे विश्व अजब आहे, अनोखे आहे. प्रा.अलोक शेवडे सांगत होते. या किटक विश्वात भ्रमती करावी म्हणून निसर्ग नवलाई किटक यात्रा प्रारंभ केली अन् पाहता पाहता ४०० च्या वर किटकांनी या यात्रेत हजेरी लावली, इती प्रा.शेवडे.आपल्या छंदाला, मनस्वी स्वभावाला योग्य वळण दिलं तर त्यातून व्यासंग निर्माण होते व आपल्यातील संशोधक वृत्ती जागृत होऊ शकते. याचा उत्तम प्रत्यय बुलडाण्यातील एका इंग्रजी विषयाच्या प्राध्यापकाने आणून दिलाय. त्यांनी किटकांमध्ये सौंदर्य शोधलंय ... ! आणि ते कॅमे-यात बंदीस्त केलय. प्रा.अलोक शेवडे यांनी केवळ छंद म्हणून आजुबाजुला दिसणार्या किटकांचे फोटो टिपायला सुरुवात केली आणि आतापर्यंत जवळपास साडेचारशे पेक्षा जास्त किटकांचे दीड हजार छायाचित्र त्यांनी टिपली आहेत. केवळ पुस्तकी अभ्यासात न रमता सौंदर्यवादी दृष्टीकोन समोर ठेवून जोपासलेला हा छंद कोणालाही संशोधनाकडे नेऊ पाहतोय.या यात्रेत आम्ही असंख्य किटकांना भेटलो. किटकांचे वर्णन व त्यांचे गुणधर्म शेवडे इतक्या सहजतेने सांगतात की, तो किटक यांना रोज भेटतो असेच वाटते. किटकांच्या किती जाती असाव्या याचा अंदाज लावणे कठीणच. अनेक किटक त्यांनी नव्याने शोधून काढलेत आणि त्यांना लिलया कॅमेराबध्द केलं आहे. रॉबर, गोल्ड ग्रीन लिफ बीटस्, कंमाडो मॉथ, आशियाई जायंट स्पायडर, यलो बॅन्डेड सॉटिपिड, गॉगलधारी किटक, नाकतोडा, रेनबो ब्ल्यु हार्नेट अशा कितीतरी किटकांचे अप्रतिम छायाचित्र शेवडेंच्या संग्रहात आहेत.मोकळा वेळ मिळताच मी जंगलाची वाट धरतो व किटकांच्या सानिध्यात रमतो असे ते सांगतात तेव्हा किटकवेड्या माणसाच भावविश्व डोळ्यासमोर येते. एकाच प्रजातीमध्ये तीन रंगाचे नाकतोडे केवळ शेवडे यांच्याच संग्रहात सापडतात. लिफ हुडेड ग्रास हॉपर अर्थात शिरस्त्राणधारी नाकतोडा असे त्याचे नाव.मात्र त्याचे सुरेख छायाचित्र पाहताच पानावर खरोखरच शिरस्त्रान ठेवल्याचा भास होतो. ऐन २६ जानेवारीला त्यांनी तिरंगा रंगाचा नाकतोडा कॅमेर्यात बदीस्त केला आहे. तो पाहिल्यावर त्यांच्या कॅमेर्याचा हेवा वाटतो. प्रा.शेवडे प्रबोधन कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत. तसेच ते अमरावती बोर्डाचे पर्यावरण विषयाचे तज्ज्ञ साधन व्यक्ती आहे. आपले अध्यापन कार्य सांभाळून प्रा.शेवडे आपला फावला वेळ जंगल भ्रमंतीत व्यतीत करतात. निसर्गाशी मानवाचे असलेले नाते अधिक घट्ट करायचा ते मनस्वी तळमळीने प्रयत्न करतात. किटक मैत्री बरोबरच ते सर्पमित्र देखील आहेत. किटकांना तर ते आराध्य दैवतच मानतात. या बाबतीत त्यांचे मत अतिशय संवेदनशील व पर्यावरण पूरक आहे. वन्य पशू-पक्षी यांच्या बरोबरच किटकही समृध्द जंगलाचे निदर्शक आहेत व सूक्ष्म अन्न भक्ष्य म्हणून त्यांचे संवर्धन अत्यावश्यक आहे, असे ते मानतात.त्यांच्या संग्रही सध्या केवळ नाकतोड्यांचे जवळपास १०० प्रकार आहेत, यावरून त्यांच्या छंदिष्ट संशोधनाची चुणूक दिसते. भटकंती दरम्यान आढळलेला प्रत्येक लहान मोठा किटक त्यांनी आजवर कॅमेराबध्द केलाय. यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम थक्क करणारे आहेत. Insect Photography हे अवघड प्रकरण त्यांनी कसे पेलले याचे रोचक वर्णन ते आपल्या स्लाईड-शो-टॉक-शो मधून करतात तेव्हा किटकांचे रोमांचकारी विश्व उभे राहते. आपल्या सभोवतालचा प्रत्येक सूक्ष्मजीव अतिशय मनोवेधक असतो याचे प्रत्यंतर त्यांनी टिपलेल्या छायाचित्रांमधून आल्याशिवाय राहत नाही. या आपल्या कलेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्याचे मोलाचे कार्य ते करत आहेत. आपल्या प्रत्यक्ष कृतीतून निसर्ग संवर्धनाचे धडे देत असतांनाच लोकांच्या मनात सौंदर्यवादी दृष्टीकोन विकसित करण्याचे अतिशय मौलिक कार्य त्यांच्या हातून घडत आहे. या विषयाच्या अभ्यासकांनी एकवेळ त्यांच्या किटक संग्रहाला आवश्य भेट द्यावी. बोथा जंगलातील ही किटक यात्रा केव्हाच संपू नये असेच वाटत होते.
रवि गिते
रवि गिते


