ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हयात प्रथम आलेल्या राहुड तालुका खामगावच्या सरपंचाचा दूरध्वनी आला...राहुडला लोकराज्य ग्राम करायचे आहे... आपण भेट द्यायला या. लोकराज्य हा जिव्हाळयाचा विषय असल्यामुळे तात्काळ राहुडची वाट धरली.
खामगाव येथून अवघ्या दहा बारा कि.मी. अंतरावर असलेल्या राहुडची प्रगती डोळ्यात भरण्यासारखीच आहे. ग्राम स्वच्छता अभियानानं राज्यातील अनेक गावांच भाग्य बदललं. राहुड त्या पैकीच एक. आदर्श ग्राम, स्वच्छ ग्राम, निर्मल ग्राम, तंटामुक्त गाव या योजना तर राहुड वासियांनी यशस्वी केल्याच पण मुलींच स्वागत करणारं गाव.. म्हणूनही या गावानं जिल्हयात नाव कमावलं आहे. जन्मलेल्या मुलीच्या नावानं हजार रुपयाचं बचत पत्र देण्याचा अभिनव उपक्रम राहुडच्या कौतुकात भर घालणाराच आहे. मोठमोठ्या गावांना ज्या बाबी शक्य आहेत पण केल्या जात नाहीत त्या योजना व कल्पना राहुड वासीय अतिशय योग्य पध्दतीनं राबवितात तेव्हा त्यांच्या कार्याचा गौरवच होतो.
राहुडमध्ये पाय ठेवताच गावाच्या समृध्दीची कल्पना येते. स्वच्छ सुंदर घरं, सांडपाण्याचे नियोजन, घरोघरी कचरा कुंड्या हे या गावाचं वैशिष्ट आहे. सुमारे १७०० लोकसंख्या असलेल्या राहुडची वाटचाल स्वच्छतेकडून समृध्दीकडे अशीच म्हणावी लागेल. गावातील नागरिकांनी एकत्र येवून शासनाच्या उपक्रमाचा फायदा घ्यायचे ठरविल्यास काय होवू शकते याचे उत्तम उदाहरण राहुडमध्ये पाहायला मिळाले.
गावात प्रवेश करताच सर्व प्रथम दर्शन व्हायचे ते हागणदारीचे आम्ही सर्व प्रथम हागणदारी मुक्त गावाचा प्रयोग राबविला, असे सरपंच लक्ष्मणराव देशमुख सांगतात. गावातील पारंपारिक गढीच्या पायथ्याशी महिला-पुरुष शौचास जात असत. ही गावासाठी चांगली गोष्ट नव्हती. आम्ही घर तेथे शौचालय ही योजना राबविली. आणि पाहता पाहता गावातील स्त्री-पुरुषांनी उघडयावर शौच्यास जाणे बंदच केले. ज्या ठिकाणी हागणदरी होती, त्या ठिकाणी सुंदर बाग तयार केली. पाच सहा वर्षापूवी आपण राहुडला आला असता तर या ठिकाणी उभे राहण्याची इच्छा होत नव्हती. पण आज आपण या बागेत बसत आहोत. असे सरपंच अभिमानाने सांगत होते. यामुळे गाव हागणदारी मुक्त झाले व निर्मलग्राम पुरस्कार मिळाला.
गावे विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यास इच्छुक असतात. पण त्यांना शासकीय पातळीवरुन प्रोत्साहन मिळायला हवे. राहुडी या बाबतीत नशीबवान आहे. गट विकास अधिकारी बी. आर. मांडीवाले यांनी राहुडला दत्तक घेतल्यासारखेच आहे. गावच्या विकासाचा आराखडा ते स्वत: तयार करतात. प्रत्येक बाबतीत जातीने लक्ष घालतात. निधी बाबतही स्वत: पुढाकार घेवून पाठपुरावा करतात. त्याचाच परिणाम म्हणजे राहुड ग्राम स्वच्छता अभियानात जिल्हयात प्रथम आले.
तालुका स्पर्धेतून सुरु झालेला राहुडचा प्रवास आता थंडावणार नाही. कारण गावकर्यांना स्वच्छतेचे महत्व पटले आहे. विद्यार्थ्यांनाही अभियानाचा उद्देश पटला आहे. पदाधिकारी, अधिकारी, गावकरी, स्त्री-पुरुष, विद्यार्थी सर्वांना वाटते राहुड राज्यात चमकले पाहिजे. हा उत्साहच गावच्या विकासाचा केंद्र बिंदू आहे. स्वच्छता अभियानांतर्गत शाहु-फुले-आंबेडकर दलितवस्ती सुधार अभियानातही या गावाने बक्षिस पटकावून एकोप्याचा संदेश दिला. गावात सामाजिक सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्यासाठी सर्व समाजाचे सण, उत्सव सार्वजनिक पध्दतीने साजरे करण्याची नवी परंपरा या गावाने सुरु केली आहे.
गाव केवळ स्वच्छता अभियान राबवून स्वस्त बसले नाही तर गावकर्यांना ओळखपत्र, आरोग्य स्मार्टकार्ड व मुलीच्या जन्माचे स्वागत या अभिनव कल्पना गावात राबविल्या जातात. मुलींचा घटता जन्मदर चिंतेची बाब असल्याची जाणीव गावकर्यांना खूप आधीपासूनच आहे. त्यासाठीच गावातील कुटुंबात जन्माला आलेल्या मुलीच्या पालकांना एक हजार रुपयाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देण्यात येवून क्रांतीज्योती कन्यारत्न पुरस्काराने गौरविण्यात येते. एखाद्या लहानशा गावातील गावकरी इतका मोठा पुरागामी विचार करत असतील ही कल्पनाच अभिनव वाटणारी आहे.
सुंदर शाळा अवती-भवती सुंदर बगीचा, परसबाग, अतिशय रमणीय वातावरण व विकासाचा ध्यास यामुळे येथील शाळेलाही साने गुरुजी स्वच्छ शाळेचा पुरस्कार मिळाला. गावाच्या विकासातील महत्वाचा अडसर असतो ते गावातील रस्त्यावर येणारे सांडपाणी कुठल्याही गावाला विद्रुप करणारी ही महत्वाची समस्या असते. पहिले ही समस्या सुटली की बाकी कामे सोयीस्कर होतील असे येथील नागरिकांनी ठरविले व त्यातूनच साकारली सांडपाणी नियोजनाची भुमिगत गटार योजना. भूमिगत गटार योजना व गावातील सिमेंटच्या रस्त्याची सगळी कामे गावाला मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून करण्यात आली. पैशाचा विनियोग व गावाचा विकास असा हा संगम आहे.
गावातील भूमिगत गटारचे पाणी गावाबाहेर तीन हैदात एकत्रित करण्यात येते. ते तेथेच फिल्टर करुन जनावरांच्या पिण्यासाठी वापरण्यात येते. यामुळे जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. एवढेच नव्हे तर, लोकवर्गणी करुन पाणी साठविण्यासाठी शिवकालीन बंधारा बांधण्यात आला. प्रायोगिक तत्वावर शाळेच्या छतावर रेन वॉटर हार्व्हेस्टींग करण्यात आले. स्वच्छतेचे व विकासाचे महत्व जाणल्यानेच हे घडले. जिल्हास्तरावर प्रथम आल्याने नागरिकांचा उत्साह व्दिगुणीत झाला आहे.
आता विभागीय स्पर्धेसाठी तयारी सुरु आहे. त्यासाठी गावकर्यांनी काही नवे संकल्प हाती घेतले आहेत. गावात मोकळया जागेत ऑक्सीजन पार्क उभारण्यात येणार आहे. शिक्षणाचा अधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गावातील एकही मुल शाळाबाह्य राहू नये यासाठी जून महिन्यात संपूर्ण गावकरी झटणार आहेत. प्रत्येक महिन्यात एक दिवस सर्व गावकरी मिळून सामूहिक स्वच्छता मोहीम राबविणार आहे. पावसाचा थेंब न थेंब अडविण्यासाठी नियोजन केले जाणार आहे.
या सार्या योजना व कल्पना गट विकास अधिकारी मांडीवाले, सरपंच देशमुख व ग्रामसेवक गिर्हे यांनी आखल्या असून राहुडला मॉडेल व्हिलेज करण्याचा संकल्प केला आहे. शासन व प्रशासन एकत्रित आले तर कसा विकास साधला जातो हे पाहायचे असेल तर एकदा राहुडला भेट द्यावीच लागेल. गावच्या विकासात महिलांचे योगदान महत्वाचे असते. राहुड मध्येही महिला यात मागे नाहीत. कर्ते पुरुष कर्तव्यासाठी बाहेर गेल्यावर गाव स्वच्छ सुंदर ठेवण्याचं काम महिलाच करतात असे सरपंच अभिमानाने सांगतात. एकंदरित राहुडची वाटचाल स्वच्छतेकडून समृध्दीकडे होत असून राहुडचा आदर्श जिल्हयातील अनेक गावांनी घ्यावा असाच आहे.
रवि गिते
रवि गिते


