
शासकीय योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीत लोकजागृतीला महत्वाचे स्थान आहे. लोकाभिमुख शासन व्यवस्थेचा कणा असलेल्या सामान्य नागरिकांना शासन आपल्यासाठी काय करते हे थेट त्यांच्यात जाऊन सांगितले तर शासनाप्रती नागरिकांची विश्वासार्हता वाढते. शासन नेहमीच लोककल्याणकारी योजना राबवीत असते परंतु त्या ज्यांच्यासाठी आहेत त्यांच्यापर्यत थेट पोहचत नाहीत असा सूर नेहमीच असतो. ही बाब ओळखून चिखली जिल्हा बुलडाणा येथील उपविभागीय अधिकारी वासंती माळी व तहसिलदार प्रा. संजय खडसे यांनी नागरिकांची सनद तयार केली आहे. वरवर पाहता ही केवळ पुस्तिका वाटत असली तरी या सनदेच्या माध्यमातुन तहसिल कार्यालयच नागरिकांपर्यंत नेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
तहसिल कार्यालयात नागरिक दररोज आपल्या अनेक कामासाठी येत असतात. साध्या साध्या कागदासाठी नागरिकांना अनेक चकरा माराव्या लागतात. एवढे करुनही काम होईलच याची शाश्वती नसते. ही बाब तहसिदार खडसे यांनी वर्षभर अभ्यासली व त्यातूनच नागरिकांची सनद निर्माण झाली.
शासकीय योजनांची मार्गदर्शक पुस्तिका असलेली ही सनद म्हणजे परिपूर्ण दस्ताऐवज म्हणावा लागेल. या मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये उत्पन्नाचे प्रमाणपत्र, हैसियत प्रमाणपत्र, शिधापत्रिका, वास्तवांचे प्रमाणपत्र, जन्ममृत्यु नोंद आदेश, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, हॉटेल परवाना मिळविण्यासाठीचा अर्ज, कार्यक्रम परवान्यासाठीचा अर्ज, संजय गांधी निराधारसाठीचा अर्ज, विधवा स्त्री साठीचे अनुदान, आदीबाबतचे अर्ज दिलेले आहेत. ही सर्व कागदपत्रे नागरिकांना तहसिल कार्यालयात एका तासात उपलब्ध करुन देण्याचा मानस खडसे यांनी बोलून दाखविला. नागरिकांची सनद पालकमंत्री मनोहर नाईक यांच्या उपस्थितीत नागरिकांना अर्पण करण्यात आली.
प्रतिज्ञापत्रासाठी नागरिकांनी बर्याचदा जास्त पैसे मोजावे लागतात. ही बाब लक्षात घेता तहसिल कार्यालयाच्या वतीने अगदी माफक दरात प्रतिज्ञापत्र लिहून देण्याची सोयही केली जाणार आहे. प्रतिज्ञापत्रात मजकूर काय असावा याचा उल्लेख नागरिकाच्या सनदमध्ये असून नागरिकांनी स्वच्छ हस्ताक्षरात प्रतिज्ञापत्र लिहिल्यास वेंडरचा खर्चही वाचू शकतो. नागरिकांच्या सनदेचे दुसरे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी लागणार्या कागदपत्राचे नमुने यात समाविष्ट आहेत. या सगळया कागदपत्रांच्या नमुन्यांचे फ्लेक्स तयार करुन तहसिल कार्यालयात लावण्यात येणार आहेत. नागरिकाची ही सनद तालुक्यातील प्रत्येक तलाठयाकडे उपलब्ध करुन देण्याची योजना तहसिल कार्यालयाची असून ज्याद्वारे नागरिकांना दैनंदिन व्यवहारांच्या कागदपत्रांसाठी पायपीट करावी लागणार नाही.
बारावी व दहावीचे निकाल लागल्यानंतर जातीचे प्रमाणपत्र व उत्पन्नाचे दाखल्यासाठी विद्यार्थ्याची मोठी गर्दी तहसिल कार्यालयात होणार आहे. हे दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थ्याना या सनदेचा खुप मोठा फायदा होणार आहे. तहसिलदार खडसे यांनी घरपोच जातीचे प्रमाणपत्र हा उपक्रम राबवून जवळपास एक हजार विद्यार्थ्याना जात प्रमाणपत्र वितरित केले आहेत. नागरिकांची सनद तयार करुन त्यांनी शासन आपल्या दारी हा उपक्रम खर्या अर्थाने राबविला आहे. नागरिकांनी या सनदेचा पुरेपुर फायदा घेतला तरच नागरिकांची सनद नागरिकांना पोहचली असे म्हणता येईल.
रवि गिते
रवि गिते

No comments:
Post a Comment