Monday, July 26, 2010

श्रीमंत सांडपाणी


बरेच दिवस झाले... महान्यूज साठी एखादं फर्स्ट पर्सन लिहिणं झालं नव्हतं... आज मात्र ठरवून मनात विषयाचा विचार करु लागलो... थोडावेळ विचार केल्यानंतर तळणी गाव आठवलं... ड्रायव्हरला म्हटले, चला मोताळा तालुक्यातील तळणी गावात जायचं आहे. बरोबर फोटोग्राफर आणि कॅमेरामन यांनाही घेतलं... प्रवास सुरु झाला... मनात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या नागपूर दौर्‍यातील स्टेटमेंटचा विचार चालू होता... मुख्यमंत्र्यांनी ग्राम विकासासाठी सांडपाण्याचे नियोजन आवश्यक असल्याचा सल्ला ग्रामवासियांना दिला होता.

याच सल्ल्याचा संदर्भ धागा पकडून मला बुलडाणा जिल्हयातील मोताळा तालुक्यातील तळणी गावाची आठवण झाली होती. या गावाने २००८ मध्ये सांडपाण्याचे योग्य नियोजन केले. एवढेच नाही तर गावातील सांडपाणी विकून ग्रामपंचायतला घसघशीत उत्पन्न मिळवून दिले. गावकर्‍यांनी ठरवले तर गावाच्या विकासाचा मार्ग सांडपाण्यातही सापडु शकतो याचा आदर्श तळणीवासियांनी घालून दिला आहे. ग्राम विकासाची दृष्टी असली तर काहीही करता येवू शकते, याचे उत्तम उदाहरण तळणी या गावाने राज्यातील इतर गावासमोर उभे केले आहे. घरा-घरातून निघणारे सांडपाणी विकून पैसा उभा करण्याचा अभिनव प्रयोग तळणी गावाने केला आहे. याच अभिनव प्रकल्पाचा अनुभव घेण्यासाठी मी तळणी गावाकडे निघालो होतो...

मोताळा तालुका मुख्यालयापासून १३ कि.मी.अंतरावर ३ हजार लोकसंख्या असलेले तळणी हे गाव आहे. गावाच्या वेशीवर पोहचलो. मी गावात येण्याबाबतचे आधीच कळविले असल्यामुळे सरपंच आशाताई आणि गावकरी वाट पाहतच होते. चहा पाणी झाले अन् मी कॅमेरामन, फोटोग्राफरसह गावात राऊंडला निघालो. बरोबर सरपंचताई, सदस्य व काही गावकरी होतेच. फिरता फिरता एक एक जण गावातल्या प्रकल्पाची माहिती उत्साहाने देऊ लागला. शामराव म्हणाले, गावकरी नेहमी पाणी टंचाईच्या काळजीने ग्रस्त असायचे. परंतु गावात महाजल योजनेतून २००७ साली पाणी पुरवठा योजना झाल्याने गावाची पाणी समस्या दूर झाली. गावकर्‍यांना आता नळाव्दारे नियमितपणे पाणी पुरवठा होतो.

मात्र नियमित पाणी पुरवठय़ामुळे सांडपाण्याच्या प्रमाणात साहजिकच वाढ झाल्याने गावातील नाल्या सुध्दा भरभरुन वाहू लागल्या. गावातून बाहेर पडणार्‍या या सांडपाण्याचा गावासाठी काही उपयोग होऊ शकतो काय ? असा विचार सरपंच आशाताई विठ्ठल नारखेडे यांनी केला. त्या उत्साहाने सांगत होत्या, सदस्य व गावकर्‍यांशी चर्चा केल्यानंतर हे सांडपाणी गावाबाहेर जमा करुन विकण्याची कल्पना समोर आली. आणि गावकरी कामाला लागले. या पाण्याचा लिलाव करुन ग्रामपंचायतला उत्पन्न मिळवून देण्याची कल्पना सुरुवातीला कठीण असली तरी एकत्रित विचाराने केलेल्या नियोजनामुळे हे सहज शक्य झाले.

मी अधीरतेने तितक्याच कुतुहलाने त्यांना विचारले, नेमकं तुम्ही काय केलं ? त्यावर त्या म्हणाल्या, गावात वाहून जाणारे पाणी गावाशेजारी असलेल्या मोठय़ा नाल्यात सोडण्यात आले. या पाण्याचा २००८ मध्ये लिलाव करण्यात आला. यातून २६ हजार ६०० रुपयाचे उत्पन्न ग्रामपंचायतला मिळाले. माझा पुढचा प्रश्न विचारण्याच्या आतच माझा प्रश्नार्थक चेहरा पाहूनच आणखी एका सदस्याने मला सांडपाणी विक्री प्रक्रियेची माहिती द्यायला सुरुवात केली. ते म्हणाले की, तळणी ग्रामपंचायतची सांडपाणी विकण्याची प्रक्रिया अतिशय पारदर्शी आहे. सांडपाण्याचे लिलावापूर्वी १५ दिवस अगोदर गावात दवंडी दिली जाते. दवंडीच्या माध्यमातून जनजागृती करुन गावातील प्रत्येक नागरिकास या प्रक्रियेत सामील करुन घेण्यात येते. जो शेतकरी जास्त बोली बोलेल त्याला त्या हंगामापुरते सांडपाणी उचलण्याचे लेखी संमतीपत्र देण्यात येते. व त्याच्याकडून आलेला पैसा सर्व सदस्याच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कोषात जमा केला जातो.

गावकरीसुध्दा या कार्यपध्दतीवर समाधानी आहेत. हे सांडपाणी विकत घेण्यासाठी गावकर्‍यांमध्ये चक्क चढाओढ लागते. कारण नेमकी पिके जेव्हा बहरात असतात तेव्हा हे पाणी पिकांना नवसंजीवनी देणारे ठरते.

आत्तापर्यंत गावातील सांडपाणी विकत घेतलेल्या तीनही शेतकर्‍यांनी पाच महिन्याच्या कालावधीत शेतीतून तब्बल साडेतीन लाख रुपयाची उत्पन्न घेतले आहे. गावाचा फेरफटका मारीत असताना त्यांच्यापैकी पद्माकर खर्चे, रामचंद्र खर्चे , रविंद्र नारखेडे हे देखील आमच्या सोबतच होते. पज्ञमाकर खर्चे यांचेकडे ५ एकर शेत आहे. त्यातील दीड एकरावर त्यांनी मिरचीची लागवड केली होती तसेच वांगेही लावली होती. त्यासाठी सांडपाण्याचा वापर करुन त्यांनी २ लाखाचे उत्पन्न मिळविले. रामचंद्र खर्चे यांचेकडे सात एकर शेती आहे. त्यांनी १ एकरावर मिरचीची लागवड करुन १ लाखाचे उत्पन्न मिळवले. तर रव्ंिाद्र नारखेडे यांनी त्यांच्या २ एकर शेतीपैकी अर्धा एकरावर मिरचीची लागवड करुन ४० ते ५० हजार रुपयाचे उत्पन्न घेतले. हे ऐकल्यावर मात्र मला त्यांचे कौतुक केल्यावाचून राहवले नाही.

वरवर पाहता ही कल्पना थोडी वेगळी व कठीण वाटली तरी तळणीवासियांनी ती यशस्वी करुन दाखविली. मार्च २०१० मध्ये याच सांडपाण्याचा लिलाव ४९ हजार रुपयात गेला. या पैशातून ग्रामपंचायतच्या विकासाला मोठाच हातभार लागला असल्याचे सरपंच आशाताई नारखेडे यांनी सांगितले.

तळणीच्या या उपक्रमाची दखल खुद्द कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेवून तळणीचे सरपंच व ग्रामसेवक यांचे अभिनंदन केले. ग्रामपंचायतीने गावाच्या विकासासाठी नव-नवीन योजना आखल्या आहेत. फिरता फिरता आम्ही ग्रामपंचायतीच्या जागेजवळ आलो. या ठिकाणी व्यापारी संकुल बांधलेले होते. ग्रामपंचायतीच्या जागेवर व्यापारी संकुल उभारुन उत्पन्न वाढविणारी या भागातील एकमेव ग्रामपंचायत असावी.

गावातला फेरफटका आटोपला...आणि आम्ही सर्वजण ग्रामपंचायतीच्या कार्यालयात येऊन स्थानापन्न झालो. एकूणच काय तर तळणी गावात पाय ठेवताक्षणीच गावाच्या समृध्दीची व विकासाची कल्पना येते. गावकर्‍यांनी एकत्र यायचे ठरविले व गावाचा विकास करायचे योजिले तर काय होऊ शकते हे पाहायचे असल्यास तळणीला भेट द्यावी... गावातील प्रत्येक नागरिकाला ओळखपत्र देणारी ग्रामपंचायत म्हणूनही तळणीचा उल्लेख केला जातो.

तळणी गावातील सांडपाणी विक्री करण्याचा प्रयोग व त्यातून ग्रामपंचायतच्या उत्पन्नात वाढ ही बाब राज्यातील इतर ग्रामपंचायतसाठी आदर्श असा उपक्रम आहे. ग्रामपंचायतीच्या महसूलात वाढ होण्यासाठी सांडपाणी विक्रीतून मोठा हातभार लागू शकतो, गावाचा विकास साधण्यासाठी सांडपाण्याबाबत अन्य ग्रामपंचायतीने हा प्रयोग राबविल्यास ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात निश्चितच भर पडणार आहे. मात्र त्यासाठी योग्य नियोजन व सकारात्मक भूमिका महत्वाची ठरणार आहे. हा आदर्श तळणी गावाने अवघ्या महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. ... आणि हाच आदर्श महान्यूजच्या माध्यमातून संपूर्ण जगात पोचविण्यासाठी मी फर्स्ट पर्सन लिहायला घेतलं...

  • रवि गिते
  • No comments:

    Post a Comment