Friday, August 27, 2010

कळ्यांचे नि:श्वास!


देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर असला तरी मुलीचा जन्मदर ही मोठी चिंता आहे. तामिळनाडू ९४२, कर्नाटक ९४६, केरळ ९६० व आंध्रप्रदेश ९६१, गुणोत्तर असले तरी २०११ च्या जनगणनेत हा आकडा कमालीचा घसरलेला असू शकतो, अशी शंका जाणकारांनी व्यक्त केली आहे. या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधणारा हा लेख -
आपले राष्ट्र हे प्राचीन संस्कृती असणारे आणि स्वत:ला आधुनिक म्हणवून घेणारे आहे. तरीही आपण, सामाजिक संभ्रमामुळे लिंगभेदाच्या असंतुलनात जगत आहोत. आíथक समृद्धी आणि शैक्षणिक उत्कर्ष होत असतानादेखील जनगणनेनुसार स्त्री-पुरुष प्रमाणतेची आकडेवारी मात्र, सुधारणा दर्शवत नाही. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २८ एप्रिल २००८ रोजी ‘कन्या वाचवा’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत आयोजित सभेच्या उद्घाटनप्रसंगी काढलेले उपरोक्त उद्गार समाजाला चिंतन करायला लावणारे आहेत. स्त्री-पुरुषांच्या समानतेचा पुरस्कार हल्ली सगळ्याच क्षेत्रात होताना दिसतो पण, प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र फारच वेगळी दिसते. लोकसंख्येतील स्त्री-पुरुष प्रमाण यावर नजर टाकल्यास भयावह चित्र डोळ्यासमोर उभे राहते.
महाराष्ट्रासारख्या प्रगत व पुरोगामी राज्यातही मुलींच्या संख्येचे घटते प्रमाण गंभीर समस्या बनत चालली आहे. महाराष्ट्रामध्ये १९९१ साली हे प्रमाण दर १००० पुरुषांमागे ९३४ स्त्रिया असे होते, ते २००१ मध्ये ९२२ पर्यंत म्हणजे १२ ने कमी झाले आहे. जनगणनेने ६ वर्षांखालील बालिका-बालक प्रमाण प्रकाशित करून याची आणखी एक गंभीर बाजू उजेडात आणली आहे. महाराष्ट्रातील ६ वर्षांखालील बालिकांचे प्रमाण दर हजार बालकांशी प्रमाण १९८१ मधील ९४६ पासून २००१ मध्ये ९१३ पर्यंत म्हणजे ३३ अंकांनी घसरले आहे. ताळतंत्र सोडून होणारी स्त्रीगर्भाची हत्या हे या मागचे मुख्य कारण असावे. नव्या पिढीला जन्म देताना जाणूनबुजून स्त्रीगर्भावर करण्यात येणारा हा अन्याय लोकसंख्येतील स्त्री-पुरुष समतोल धोक्यात आणणारा आहे.
देशासह महाराष्ट्राच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास मुलींच्या संख्येचे घटते प्रमाण जागतिक समस्या झाली असल्याचे निदर्शनास येते. १९९१ मध्ये ० ते ६ वर्ष वयाच्या हजार मुलांमागे ९४५ मुली होत्या तर हे प्रमाण २००१ मध्ये ९२७ वर आले आहे. तर महाराष्ट्राचे चित्र यापेक्षाही गंभीर आहे. १९९१ मध्ये महाराष्ट्रात ० ते ६ वर्ष वयाच्या बालकांमागे ९४६ मुली होत्या तर २००१ मध्ये ९१३ व २००९ मध्ये हे प्रमाण ९०९ वर येऊन ठेपले आहे. २०११ च्या जनगणनेचे काम सुरू असून या जनगणनेची आकडेवारी जाहीर होताच हे प्रमाण किती खाली आले असेल याची कल्पनाच न केलेली बरी. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र ५व्या क्रमांकावर असला तरी मुलीचा जन्मदर ही मोठी चिंता आहे. तामिळनाडू ९४२, कर्नाटक ९४६, केरळ ९६० व आंध्रप्रदेश ९६१, गुणोत्तर असले तरी २०११ च्या जनगणनेत हा आकडा कमालीचा घसरलेला असू शकतो, अशी शंका जाणकार व्यक्त करतात. गुजरातसारख्या प्रगत राज्यातही मुलींची संख्या समाधानकारक नसल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. २००१ च्या जनगणनेनुसार गुजरातमध्ये एक हजार मुलांमागे केवळ ८८३ मुली आहेत तर पंजाब राज्यात हे प्रमाण केवळ ७९८ एवढे आहे. या मुलींच्या घटत्या संख्येचे मूळ कारण गर्भजल परीक्षण व त्यानंतर स्त्रीगर्भाची हत्या हेच आहे.
महाराष्ट्रातील तालुक्यांच्या आकडेवारीचा आढावा घेतल्यास खूप भीषण वास्तव समोर येते आहे. राज्यातील १२६ तालुक्यात ३६ टक्क्यांनी, ८१ तालुक्यात २३ टक्क्यांनी, ५९ तालुक्यात १७ टक्क्यांनी, ३७ तालुक्यात १० टक्क्यांनी तर ९ तालुक्यात २ टक्क्यांनी मुलींचे प्रमाण घटले आहे. यात थोडी समाधानाची बाब अशी की, ३८ तालुक्यात ११ टक्क्यांनी मुलींचे प्रमाण वाढले असून तीन तालुक्यात हे प्रमाण स्थिर आहे.महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा विभागाने प्रसारित केलेल्या आकडेवारीनुसार ० ते ६ वर्ष वयांच्या बालिका, बालकांचे प्रमाण मोठय़ा शहरात झपाटय़ाने घटताना दिसत आहे. त्या तुलनेत लहान जिल्हे व अविकसित जिल्हे याला अपवाद ठरत आहेत. गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्य़ात १९९१ मध्ये १ हजार मुलांमागे ९८० मुली, २००१ मध्ये ९६६ मुली तर २००९ मध्ये ९६५ मुली असा जन्मदर आहे. तर बुलढाणा जिल्ह्य़ात १९९१ मध्ये ९४५, २००१ मध्ये ९०८ व २००९ मध्ये ८७१ असे प्रमाण आहे. ही आकडेवारी अतिशय चिंतेची बाब असून गर्भलिंग निदानाकडे ओढा वाढल्याने मुलींची संख्या घटत असल्याचा अंदाज आहे. राज्यात दुसऱ्या क्रमांकावर ठाणे हा आदिवासी जिल्हा असून तेथील दर ९६२ एवढा आहे. तिसऱ्या क्रमांकावर गोंदिया ९५९, चौथ्या क्रमांकावर नंदूरबार ९५१, पाचवा चंद्रपूर ९४९, सहावा भंडारा ९४७, सातवा रत्नागिरी ९४१ एवढा जन्मदर आहे. हे सगळे जिल्हे आदिवासी व मागासबहुल आहेत हे विशेष.मुंबईसारख्या महानगरात मुलींचे प्रमाण हजारी ९२७, नागपूर ९३८, नाशिक ९२०, पुणे ८९५, औरंगाबाद ८८७ एवढे कमी आहे. राज्य शासनाने सोनोग्राफी केंद्रावर अंकुश ठेवण्याचे काम केले असले तरी अजूनही शहरी भागात गर्भलिंग निदान होत असल्याचे या आकडेवारीवरून निदर्शनास येते. यासाठी नागरिकांनी स्वत: जागृत भूमिका बजावणे क्रमप्राप्त झाले आहे. मुलींचे प्रमाण अशाच प्रकारे घटत राहिले तर भविष्यात खूप मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
गर्भजल परीक्षण विरोधी कडक कायदा असला तरी सोनोग्राफी सेंटरवर मोठय़ा प्रमाणात गर्भजल निदान होत असल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत असतात. यावर कारवाई होणे गरजेचे झाले आहे. मुलींच्या घटत्या जन्मदराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. असे असले तरी सुशिक्षित व प्रगतशील समाजात मुलीचा जन्मदर झपाटय़ाने घटताना दिसत आहे. देशाच्या पहिल्या पंतप्रधान दिवं. इंदिरा गांधी, देशाच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यासारख्या कर्तबगार महिलांचे उदाहरण सातत्याने देणारा आपला समाज मुलींची गर्भातच हत्या करून काय साध्य करतो याचे चिंतन समाजाला आजच करावे लागेल. भविष्यात निर्माण होणारी समस्या ओळखून लेक वाचवा अभियान व्यापक व समाजाभिमुख करण्याची आवश्यकता या निमित्ताने निर्माण झाली आहे.
भारतात गर्भलिंग निदान केल्यामुळे दरवर्षी अंदाजे एक लाखाहून अधिक गर्भपात होत आहे. (अरनॉल्ड किशोर आणि रॉय), रूढी (मुलांचा हव्यास) व आधुनिक तंत्रज्ञान (सोनोग्राफी) यामधील घातक हातमिळवणीने भारतीय समाजात गहजब माजवला आहे. (डॉ. आशिष बोस), ०-६ वर्ष वयाचे बालक बालिकांचे बिघडलेले असंतुलन निट करणे कठीण आहे आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला खूप काळापर्यंत भोवणार आहेत. (जे.के. बंठीया भारताचे महानिबंधक जनगणना) व भारतात दरवर्षी सुमारे ५ लाख मुली जन्माला येण्यापूर्वीच जीवनाला मुकतात ही खंत मान्यवरांनी व्यक्त केली आहे. ती तंतोतंत खरी आहे.
२००९ मधील ० ते ६ वर्ष वयाच्या बालिका/बालकांचे प्रमाणजिल्हा
गडचिरोली ९६५ ठाणे ९६२गोंदिया ९५९नंदूरबार ९५१चंद्रपूर ९४९भंडारा ९४७रत्नागिरी ९४१नागपूर-वर्धा ९३८रायगड ९३६नांदेड ९२९अकोला ९२८मुंबई ९२७यवतमाळ-सिंधुदुर्ग ९२६अमरावती ९२३नाशिक ९२०धुळे ९१६परभणी ९१२लातूर ९०७हिंगोली-सोलापूर ८९७जालना ८९६सातारा-पुणे ८९५औरंगाबाद ८८७वाशीम-उस्मानाबाद ८७४बुलढाणा ८७१सांगली ८६८जळगाव-कोल्हापूर ८५४अहमदनगर ८५२बीड ८४३

रवी गीते

Monday, August 16, 2010

प्रेरणादायी लोकराज्य शाळा


लोकराज्य शाळा ही संकल्पना राज्यात सर्वप्रथम बुलडाणा जिल्हा माहिती कार्यालयाने राबविली आहे. शहरापासून जवळच असलेल्या कोलवड येथील विद्या विकास विद्यालय या शाळेला राज्यातील पहिली लोकराज्य शाळा होण्याचा बहुमान मिळाला.या कार्यक्रमास सर्वदूर प्रसिध्दी मिळाल्याने जिल्हयातील इतर शाळांनीही लोकराज्य शाळा बनविण्याचा संकल्प केला. बर्‍याचशा शाळा लोकराज्य शाळा झालेल्या आहेत. त्यापैकीच एक उर्‍हा येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा...

ही शाळा जिल्ह्यातील नामवंत शाळेपैकी एक शाळा आहे... याचे कारण म्हणजे त्या गावातील शिक्षक, पालक, गावकरी यांनी एकत्रितपणे केलेले वैविध्यपूर्ण प्रयत्न. या गावाबद्दल बर्‍याच पत्रकार मित्रांकडून तसेच इतर कार्यालयातील सहकारी अधिकार्‍यांकडून खूप चांगल्या गोष्टी ऐकल्या होत्या. त्यामुळे मी लागलीच उर्‍हा गावाचा दौरा आखला.

बुलडाणा जिल्हयातील मोताळा या तालुक्याच्या गावापासून २७ कि.मी. अंतरावर उर्‍हा हे गाव. सकाळी आठ वाजेच्या आसपासचं गावात पोहचलो. कॅमेरामन, फोटोग्राफर यांना सोबतीला घेतले होते. आम्ही गाडीतून उतरताच आमच्याभोवती गावकर्‍यांनी गर्दी केली. सरपंच बालमुकूंद पाटील यांनी आम्हाला ग्रामपंचायतीकडे नेले. मस्तपैकी गरमा-गरम पोहे खाल्ले आणि त्यानंतर फक्कडसा चहा झाला. चहा नाश्त्याचा कार्यक्रम सूरू असतानाच गावकर्‍यांशी गप्पाही चालूच होत्या. त्यातून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे, गाव छोटं असलं तरी गावकर्‍यांची अभिरुची, जीवन जगण्याची कल्पना अफलातून सुंदर आणि वाखणण्याजोगी आहे.

सरपंच बालमुकूंद पाटील यांनी जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चवथी पर्यंतची आदर्श शाळा निमार्ण केली आहे. त्याविषयी मी त्यांना विचारले असता ते म्हणाले, विविध नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अंकुश राठोड, सहाय्यक शिक्षक प्रदीप बयेस व राजेंद्र भोई या तरूण शिक्षकांनी खूपच मेहनत घेतली आहे. या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अंगी असलेल्या सृजनशिलतेचा कल्पकतेने वापर करून नियोजनपूर्वक विविध उपक्रमांची आखणी करून आम्ही सर्वांनी त्याची काटेकोर अंमलबजावणी केली. या सार्‍याचे फलित म्हणून शाळेला साने गुरुजी स्वच्छ शाळा स्पर्धेत २००७-०८ या वर्षामध्ये प्रथम क्रमांक मिळाला. हे समजल्यावर मी शेकहॅन्ड करीत त्यांचे अभिनंदन केले, आणि त्यानंतर आम्ही शाळेकडे निघालो.

शिक्षक, सरपंच आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून स्वच्छ, सुंदर व हिरवी शाळा म्हणून या शाळेची ओळख बनली आहे. शाळेच्या आवारात पाऊल टाकताच सुंदरशी रंगरंगोटी झालेली ती शाळा नजरेत भरते. शाळेच्या भिंतीवर शिक्षणाचा अर्थ, मुल्य संवर्धन तक्ता, विविध नकाशे, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, भारताचे संविधान, वंदेमातरम, पसायदान, दैनिक परिपाठ तसेच स्वच्छतेच्या संदेशाबाबतची बोलकी चित्रे रंगविली आहेत. ही चित्रे बघण्यात मी गुंग झालो. अन् इतक्यातच मुख्याध्यापक अंकुश राठोड, नमस्कार सर ! म्हणत माझ्या जवळ आले. मी त्यांना शाळा इतकी सुंदर केल्याबद्दलचे कॉम्पलीमेंट्स देऊन शाळेबद्दलची आणखी माहिती विचारली.

त्यांनी उत्साहाने सांगायला सुरुवात केली. या शाळेत वृक्षारोपण व संवर्धन, रेन हार्वेस्टींग, शाळेच्या समोर कमान असून या कमानीवर गट पध्दती, स्वयंशिस्त , सुंदर शाळा, हिरवी शाळा, तंटामुक्त शाळा, ज्ञानकुंड, शालेय मंत्रीमंडळ, परिपाठ मंडळ, विद्यार्थी स्वच्छता समिती, आरोग्य शिक्षण कोपरा, गणित व विज्ञान कोपरा, वाचन कोपरा इत्यादी उपक्रम राबविले जातात. याच्या पाटय़ा शाळेत त्या त्या ठिकाणी लावलेल्या दिसत होत्या.

शाळेतील वर्गासमोरुन जाताना एक गोष्ट लक्षात आली की, या शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र नळ व्यवस्था असून प्रत्येक वर्गासमोर नळ आहे. शालेय परसबाग आहे. वर्ग रचना गट पध्दतीची असून हुशार विद्यार्थ्यांना गट प्रमुख बनविले आहे.

सर्व शिक्षा अभियानाचा शाळेला झालेल्या उपयोगाबाबत इतर शिक्षकांनी दिलखुलासपणे सांगितले की, सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळणार्‍या शिक्षक अनुदानातून आम्ही शैक्षणिक साहित्य तयार करून रचनाबध्द पध्दतीने लावले. याचा लाभ विद्यार्थ्यांना सुमारे ८३ टक्के ज्ञान डोळयांनी मिळू लागण्यामध्ये झाला.

शाळेतील एकूणच स्वच्छता पाहून सहज लक्षात येत होते की, शाळेत स्वच्छतेला अतिशय महत्व दिले जाते. याशिवाय शाळेच्या मुख्य कार्यालयातून सूचना देण्यासाठी व परिपाठ घेण्यासाठी ध्वनीक्षेपण यंत्रणेचा वापर केला जातो. शिवाय ही शाळा घंटामुक्त असल्याने विद्यार्थी वक्तशीरपणा, काटेकोरपणे पाळतात. कचरा टाकण्यासाठी शाळेत कचराकुंडी, विद्यार्थ्यांनी थुंकीने पाटी पुसु नये म्हणून बादलीत पाणी भरलेले असते. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी विविध साहित्य पुरविले जाते. शाळेत मुतारी व शैचालयाची व्यवस्था असून हात धुण्यासाठी रुमाल व साबण ठेवलेले आहेत. अशा विविध उपक्रम राबविण्यात आघाडीवर असलेली ही शाळा आदर्श न ठरली तर नवलचं... या शाळेने राबविलेले सर्व उपक्रम पाच राज्यात राबविण्याचा विचार होऊ लागला आहे, असे झाल्यास हा जिल्हयाचा गौरवच होईल. असे माझ्या मनात आले. सरपंच, मुख्याध्यापक व शिक्षक , विद्यार्थी या सर्वांचे मन:पूर्वक कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि सर्वांचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. प्रवासात एकच विचार सुरु होता, असे उपक्रम सर्वच शाळांमध्ये राबविण्यास सुरवात झाल्यास उद्याच्या पिढीचा पाया आणखी भक्कम होण्यास निश्चितच बळ मिळेल यात शंकाच नाही...

  • रवी गिते
  • Monday, July 26, 2010

    श्रीमंत सांडपाणी


    बरेच दिवस झाले... महान्यूज साठी एखादं फर्स्ट पर्सन लिहिणं झालं नव्हतं... आज मात्र ठरवून मनात विषयाचा विचार करु लागलो... थोडावेळ विचार केल्यानंतर तळणी गाव आठवलं... ड्रायव्हरला म्हटले, चला मोताळा तालुक्यातील तळणी गावात जायचं आहे. बरोबर फोटोग्राफर आणि कॅमेरामन यांनाही घेतलं... प्रवास सुरु झाला... मनात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या नागपूर दौर्‍यातील स्टेटमेंटचा विचार चालू होता... मुख्यमंत्र्यांनी ग्राम विकासासाठी सांडपाण्याचे नियोजन आवश्यक असल्याचा सल्ला ग्रामवासियांना दिला होता.

    याच सल्ल्याचा संदर्भ धागा पकडून मला बुलडाणा जिल्हयातील मोताळा तालुक्यातील तळणी गावाची आठवण झाली होती. या गावाने २००८ मध्ये सांडपाण्याचे योग्य नियोजन केले. एवढेच नाही तर गावातील सांडपाणी विकून ग्रामपंचायतला घसघशीत उत्पन्न मिळवून दिले. गावकर्‍यांनी ठरवले तर गावाच्या विकासाचा मार्ग सांडपाण्यातही सापडु शकतो याचा आदर्श तळणीवासियांनी घालून दिला आहे. ग्राम विकासाची दृष्टी असली तर काहीही करता येवू शकते, याचे उत्तम उदाहरण तळणी या गावाने राज्यातील इतर गावासमोर उभे केले आहे. घरा-घरातून निघणारे सांडपाणी विकून पैसा उभा करण्याचा अभिनव प्रयोग तळणी गावाने केला आहे. याच अभिनव प्रकल्पाचा अनुभव घेण्यासाठी मी तळणी गावाकडे निघालो होतो...

    मोताळा तालुका मुख्यालयापासून १३ कि.मी.अंतरावर ३ हजार लोकसंख्या असलेले तळणी हे गाव आहे. गावाच्या वेशीवर पोहचलो. मी गावात येण्याबाबतचे आधीच कळविले असल्यामुळे सरपंच आशाताई आणि गावकरी वाट पाहतच होते. चहा पाणी झाले अन् मी कॅमेरामन, फोटोग्राफरसह गावात राऊंडला निघालो. बरोबर सरपंचताई, सदस्य व काही गावकरी होतेच. फिरता फिरता एक एक जण गावातल्या प्रकल्पाची माहिती उत्साहाने देऊ लागला. शामराव म्हणाले, गावकरी नेहमी पाणी टंचाईच्या काळजीने ग्रस्त असायचे. परंतु गावात महाजल योजनेतून २००७ साली पाणी पुरवठा योजना झाल्याने गावाची पाणी समस्या दूर झाली. गावकर्‍यांना आता नळाव्दारे नियमितपणे पाणी पुरवठा होतो.

    मात्र नियमित पाणी पुरवठय़ामुळे सांडपाण्याच्या प्रमाणात साहजिकच वाढ झाल्याने गावातील नाल्या सुध्दा भरभरुन वाहू लागल्या. गावातून बाहेर पडणार्‍या या सांडपाण्याचा गावासाठी काही उपयोग होऊ शकतो काय ? असा विचार सरपंच आशाताई विठ्ठल नारखेडे यांनी केला. त्या उत्साहाने सांगत होत्या, सदस्य व गावकर्‍यांशी चर्चा केल्यानंतर हे सांडपाणी गावाबाहेर जमा करुन विकण्याची कल्पना समोर आली. आणि गावकरी कामाला लागले. या पाण्याचा लिलाव करुन ग्रामपंचायतला उत्पन्न मिळवून देण्याची कल्पना सुरुवातीला कठीण असली तरी एकत्रित विचाराने केलेल्या नियोजनामुळे हे सहज शक्य झाले.

    मी अधीरतेने तितक्याच कुतुहलाने त्यांना विचारले, नेमकं तुम्ही काय केलं ? त्यावर त्या म्हणाल्या, गावात वाहून जाणारे पाणी गावाशेजारी असलेल्या मोठय़ा नाल्यात सोडण्यात आले. या पाण्याचा २००८ मध्ये लिलाव करण्यात आला. यातून २६ हजार ६०० रुपयाचे उत्पन्न ग्रामपंचायतला मिळाले. माझा पुढचा प्रश्न विचारण्याच्या आतच माझा प्रश्नार्थक चेहरा पाहूनच आणखी एका सदस्याने मला सांडपाणी विक्री प्रक्रियेची माहिती द्यायला सुरुवात केली. ते म्हणाले की, तळणी ग्रामपंचायतची सांडपाणी विकण्याची प्रक्रिया अतिशय पारदर्शी आहे. सांडपाण्याचे लिलावापूर्वी १५ दिवस अगोदर गावात दवंडी दिली जाते. दवंडीच्या माध्यमातून जनजागृती करुन गावातील प्रत्येक नागरिकास या प्रक्रियेत सामील करुन घेण्यात येते. जो शेतकरी जास्त बोली बोलेल त्याला त्या हंगामापुरते सांडपाणी उचलण्याचे लेखी संमतीपत्र देण्यात येते. व त्याच्याकडून आलेला पैसा सर्व सदस्याच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कोषात जमा केला जातो.

    गावकरीसुध्दा या कार्यपध्दतीवर समाधानी आहेत. हे सांडपाणी विकत घेण्यासाठी गावकर्‍यांमध्ये चक्क चढाओढ लागते. कारण नेमकी पिके जेव्हा बहरात असतात तेव्हा हे पाणी पिकांना नवसंजीवनी देणारे ठरते.

    आत्तापर्यंत गावातील सांडपाणी विकत घेतलेल्या तीनही शेतकर्‍यांनी पाच महिन्याच्या कालावधीत शेतीतून तब्बल साडेतीन लाख रुपयाची उत्पन्न घेतले आहे. गावाचा फेरफटका मारीत असताना त्यांच्यापैकी पद्माकर खर्चे, रामचंद्र खर्चे , रविंद्र नारखेडे हे देखील आमच्या सोबतच होते. पज्ञमाकर खर्चे यांचेकडे ५ एकर शेत आहे. त्यातील दीड एकरावर त्यांनी मिरचीची लागवड केली होती तसेच वांगेही लावली होती. त्यासाठी सांडपाण्याचा वापर करुन त्यांनी २ लाखाचे उत्पन्न मिळविले. रामचंद्र खर्चे यांचेकडे सात एकर शेती आहे. त्यांनी १ एकरावर मिरचीची लागवड करुन १ लाखाचे उत्पन्न मिळवले. तर रव्ंिाद्र नारखेडे यांनी त्यांच्या २ एकर शेतीपैकी अर्धा एकरावर मिरचीची लागवड करुन ४० ते ५० हजार रुपयाचे उत्पन्न घेतले. हे ऐकल्यावर मात्र मला त्यांचे कौतुक केल्यावाचून राहवले नाही.

    वरवर पाहता ही कल्पना थोडी वेगळी व कठीण वाटली तरी तळणीवासियांनी ती यशस्वी करुन दाखविली. मार्च २०१० मध्ये याच सांडपाण्याचा लिलाव ४९ हजार रुपयात गेला. या पैशातून ग्रामपंचायतच्या विकासाला मोठाच हातभार लागला असल्याचे सरपंच आशाताई नारखेडे यांनी सांगितले.

    तळणीच्या या उपक्रमाची दखल खुद्द कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेवून तळणीचे सरपंच व ग्रामसेवक यांचे अभिनंदन केले. ग्रामपंचायतीने गावाच्या विकासासाठी नव-नवीन योजना आखल्या आहेत. फिरता फिरता आम्ही ग्रामपंचायतीच्या जागेजवळ आलो. या ठिकाणी व्यापारी संकुल बांधलेले होते. ग्रामपंचायतीच्या जागेवर व्यापारी संकुल उभारुन उत्पन्न वाढविणारी या भागातील एकमेव ग्रामपंचायत असावी.

    गावातला फेरफटका आटोपला...आणि आम्ही सर्वजण ग्रामपंचायतीच्या कार्यालयात येऊन स्थानापन्न झालो. एकूणच काय तर तळणी गावात पाय ठेवताक्षणीच गावाच्या समृध्दीची व विकासाची कल्पना येते. गावकर्‍यांनी एकत्र यायचे ठरविले व गावाचा विकास करायचे योजिले तर काय होऊ शकते हे पाहायचे असल्यास तळणीला भेट द्यावी... गावातील प्रत्येक नागरिकाला ओळखपत्र देणारी ग्रामपंचायत म्हणूनही तळणीचा उल्लेख केला जातो.

    तळणी गावातील सांडपाणी विक्री करण्याचा प्रयोग व त्यातून ग्रामपंचायतच्या उत्पन्नात वाढ ही बाब राज्यातील इतर ग्रामपंचायतसाठी आदर्श असा उपक्रम आहे. ग्रामपंचायतीच्या महसूलात वाढ होण्यासाठी सांडपाणी विक्रीतून मोठा हातभार लागू शकतो, गावाचा विकास साधण्यासाठी सांडपाण्याबाबत अन्य ग्रामपंचायतीने हा प्रयोग राबविल्यास ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात निश्चितच भर पडणार आहे. मात्र त्यासाठी योग्य नियोजन व सकारात्मक भूमिका महत्वाची ठरणार आहे. हा आदर्श तळणी गावाने अवघ्या महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. ... आणि हाच आदर्श महान्यूजच्या माध्यमातून संपूर्ण जगात पोचविण्यासाठी मी फर्स्ट पर्सन लिहायला घेतलं...

  • रवि गिते
  • Wednesday, June 16, 2010

    लोकाभिमुख उपक्रमाची त्रिसुत्री


    शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत लोकजागृतीला महत्वाचे स्थान आहे. लोकाभिमुख शासन व्यवस्थेचा कणा असलेल्या सामान्य नागरिकांना शासन आपल्यासाठी काय करते हे थेट त्यांच्यात मिसळून सांगितले तर शासनाप्रती त्यांची विश्वासार्हता वाढते. शासन नेहमीच लोककल्याणकारी योजना राबवित असते. परंतु त्या ज्यांच्यासाठी आहेत त्यांच्यापर्यत थेट पोहोचत नाहीत असा नकारात्मक सूर ऐकायला मिळतो. हाच दृष्टिकोन सकारात्मक बनविण्यासाठी शासनासोबतच बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याच्या प्रशासनाची सामाजिक बांधिलकी विकासासाठी महत्वपूर्ण ठरते आहे.

    चिखली येथील तहसिलदार प्रा. संजय खडसे यांनी चिखली तालुक्यासाठी अनेक महत्वपूर्ण व लोकाभिमुक उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांना नागरिकांनी प्रतिसाद तर दिलाच आहे, त्याचबरोबर त्यांचा शासनाप्रती विश्वासही वृध्दिंगत झाला. विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र, वन हक्काचे पट्टे वाटप, नागरिकांची सनद, पारधी जमातींना पाड्यावर जाऊन रेशनकार्ड देणे, अनाथ मुलांना शोधून त्यांना योजनांचा फायदा देणे, तलाठ्यांना लॅपटॉप देणे अशा वैशिष्ट्यपूर्ण योजना तालुक्यात राबविण्यात आल्या आहेत. तसेच शैक्षणिक क्षेत्रात प्रत्येक विद्यार्थ्यास जात प्रमाणपत्र, आधिवास दाखला व लोकराज्य हा त्रिसुत्री कार्यक्रम आखण्यात आला आहे.

    दहावी, बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी जात प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार आहे, त्यासाठीचे नियोजन चिखली तहसिल कार्यालयाने वर्षभरापूर्वीच केले आहे. विद्यार्थ्यांना थेट शाळेतच जात प्रमाणपत्र देण्याचा अभिनव उपक्रम येथे राबविण्यात आला आहे. त्याअंतर्गत १८०० विद्यार्थ्यांना जानेवारी २०१० पर्यंत जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रासाठी भटकावे लागणार नाही. हिच मोहीम यावर्षी ऑगस्टपासून राबविण्यात येणार असून यावेळी एकही विद्यार्थी जात प्रमाणपत्राशिवाय राहणार नाही याचे नियोजन करण्यात आले आहे.

    तहसिल कार्यालयामध्ये येणार्‍या नागरिकांना कोणत्याही कामासाठी त्रास सहन करावा लागू नये यासाठी नागरिकांची सनद तयार करण्यात आली आहे. वरवर पाहता ही केवळ पुस्तिका वाटत असली तरी या सनदेच्या माध्यमातून तहसिल कार्यालयच नागरिकांपर्यंत नेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. तहसिल कार्यालयात नागरिक दररोज आपल्या अनेक कामांसाठी येत असतात. साध्या-साध्या कागदपत्रांसाठी नागरिकांना अनेक टेबलांवर चकरा माराव्या लागतात. एवढे करुणही काम होईलच याची शाश्वती नसते. ही बाब तहसिदार श्री. खडसे यांनी वर्षभर अभ्यासली व त्यातूनच नागरीकांची सनद निर्माण झाली. या सनदीमुळे नागरिक व तहसिल कार्यालय यातील अंतर खुप कमी झाले आहे.

    वारंवार भटकंतीवर असणार्‍या पारधी जमातींना सोयी-सवलती पुरवाव्या हे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार तहसिलदार खडसे यांनी १०१ पारधी बांधवांना रेशनकार्ड बनवून दिले. त्याचबरोबर तालुक्यातील अनाथ मुलांचा शोध घेऊन त्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. आता त्यांच्या शिक्षणाची व वसतिगृह प्रवेशाची जबाबदारीही खडसे यांनी स्वीकारली आहे.

    नागरिकांना त्यांची कागदपत्रे बिनचूक व वेळेत मिळण्यासाठी खडसे यांनी तलाठ्यांना लॅपटॉप दिलेत. यामुळे महसूल विभागाच्या कामकाजाला गती प्राप्त झाली. प्रायोगिक तत्त्वावर १६ तलाठ्यांना लॅपटॉप दिले असले तरी लवकरच जिल्ह्यातील सगळे तलाठी आपले कामकाज लॅपटॉपवरच करतील यावर त्यांनी भर दिला आहे. जात प्रमाणपत्र, अधिवास दाखला व लोकराज्य ही त्रिसुत्री तहसील कार्यालयाने तयार केली असून पुढील दोन महिन्यांत यासाठी प्रत्येक शाळा, महाविद्यालयात हा कार्यक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. नागरिकांप्रती सामाजिक बांधिलकी ठेवल्यास प्रशासकीय कामकाज कौतुकास्पद ठरते ही बाब या उपक्रमांवरुन दिसून येते.
    रवि गिते

    Saturday, May 29, 2010

    ' एक गाव राहुड'


    ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हयात प्रथम आलेल्या राहुड तालुका खामगावच्या सरपंचाचा दूरध्वनी आला...राहुडला लोकराज्य ग्राम करायचे आहे... आपण भेट द्यायला या. लोकराज्य हा जिव्हाळयाचा विषय असल्यामुळे तात्काळ राहुडची वाट धरली.

    खामगाव येथून अवघ्या दहा बारा कि.मी. अंतरावर असलेल्या राहुडची प्रगती डोळ्यात भरण्यासारखीच आहे. ग्राम स्वच्छता अभियानानं राज्यातील अनेक गावांच भाग्य बदललं. राहुड त्या पैकीच एक. आदर्श ग्राम, स्वच्छ ग्राम, निर्मल ग्राम, तंटामुक्त गाव या योजना तर राहुड वासियांनी यशस्वी केल्याच पण मुलींच स्वागत करणारं गाव.. म्हणूनही या गावानं जिल्हयात नाव कमावलं आहे. जन्मलेल्या मुलीच्या नावानं हजार रुपयाचं बचत पत्र देण्याचा अभिनव उपक्रम राहुडच्या कौतुकात भर घालणाराच आहे. मोठमोठ्या गावांना ज्या बाबी शक्य आहेत पण केल्या जात नाहीत त्या योजना व कल्पना राहुड वासीय अतिशय योग्य पध्दतीनं राबवितात तेव्हा त्यांच्या कार्याचा गौरवच होतो.

    राहुडमध्ये पाय ठेवताच गावाच्या समृध्दीची कल्पना येते. स्वच्छ सुंदर घरं, सांडपाण्याचे नियोजन, घरोघरी कचरा कुंड्या हे या गावाचं वैशिष्ट आहे. सुमारे १७०० लोकसंख्या असलेल्या राहुडची वाटचाल स्वच्छतेकडून समृध्दीकडे अशीच म्हणावी लागेल. गावातील नागरिकांनी एकत्र येवून शासनाच्या उपक्रमाचा फायदा घ्यायचे ठरविल्यास काय होवू शकते याचे उत्तम उदाहरण राहुडमध्ये पाहायला मिळाले.

    गावात प्रवेश करताच सर्व प्रथम दर्शन व्हायचे ते हागणदारीचे आम्ही सर्व प्रथम हागणदारी मुक्त गावाचा प्रयोग राबविला, असे सरपंच लक्ष्मणराव देशमुख सांगतात. गावातील पारंपारिक गढीच्या पायथ्याशी महिला-पुरुष शौचास जात असत. ही गावासाठी चांगली गोष्ट नव्हती. आम्ही घर तेथे शौचालय ही योजना राबविली. आणि पाहता पाहता गावातील स्त्री-पुरुषांनी उघडयावर शौच्यास जाणे बंदच केले. ज्या ठिकाणी हागणदरी होती, त्या ठिकाणी सुंदर बाग तयार केली. पाच सहा वर्षापूवी आपण राहुडला आला असता तर या ठिकाणी उभे राहण्याची इच्छा होत नव्हती. पण आज आपण या बागेत बसत आहोत. असे सरपंच अभिमानाने सांगत होते. यामुळे गाव हागणदारी मुक्त झाले व निर्मलग्राम पुरस्कार मिळाला.

    गावे विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यास इच्छुक असतात. पण त्यांना शासकीय पातळीवरुन प्रोत्साहन मिळायला हवे. राहुडी या बाबतीत नशीबवान आहे. गट विकास अधिकारी बी. आर. मांडीवाले यांनी राहुडला दत्तक घेतल्यासारखेच आहे. गावच्या विकासाचा आराखडा ते स्वत: तयार करतात. प्रत्येक बाबतीत जातीने लक्ष घालतात. निधी बाबतही स्वत: पुढाकार घेवून पाठपुरावा करतात. त्याचाच परिणाम म्हणजे राहुड ग्राम स्वच्छता अभियानात जिल्हयात प्रथम आले.

    तालुका स्पर्धेतून सुरु झालेला राहुडचा प्रवास आता थंडावणार नाही. कारण गावकर्‍यांना स्वच्छतेचे महत्व पटले आहे. विद्यार्थ्यांनाही अभियानाचा उद्देश पटला आहे. पदाधिकारी, अधिकारी, गावकरी, स्त्री-पुरुष, विद्यार्थी सर्वांना वाटते राहुड राज्यात चमकले पाहिजे. हा उत्साहच गावच्या विकासाचा केंद्र बिंदू आहे. स्वच्छता अभियानांतर्गत शाहु-फुले-आंबेडकर दलितवस्ती सुधार अभियानातही या गावाने बक्षिस पटकावून एकोप्याचा संदेश दिला. गावात सामाजिक सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्यासाठी सर्व समाजाचे सण, उत्सव सार्वजनिक पध्दतीने साजरे करण्याची नवी परंपरा या गावाने सुरु केली आहे.

    गाव केवळ स्वच्छता अभियान राबवून स्वस्त बसले नाही तर गावकर्‍यांना ओळखपत्र, आरोग्य स्मार्टकार्ड व मुलीच्या जन्माचे स्वागत या अभिनव कल्पना गावात राबविल्या जातात. मुलींचा घटता जन्मदर चिंतेची बाब असल्याची जाणीव गावकर्‍यांना खूप आधीपासूनच आहे. त्यासाठीच गावातील कुटुंबात जन्माला आलेल्या मुलीच्या पालकांना एक हजार रुपयाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देण्यात येवून क्रांतीज्योती कन्यारत्न पुरस्काराने गौरविण्यात येते. एखाद्या लहानशा गावातील गावकरी इतका मोठा पुरागामी विचार करत असतील ही कल्पनाच अभिनव वाटणारी आहे.

    सुंदर शाळा अवती-भवती सुंदर बगीचा, परसबाग, अतिशय रमणीय वातावरण व विकासाचा ध्यास यामुळे येथील शाळेलाही साने गुरुजी स्वच्छ शाळेचा पुरस्कार मिळाला. गावाच्या विकासातील महत्वाचा अडसर असतो ते गावातील रस्त्यावर येणारे सांडपाणी कुठल्याही गावाला विद्रुप करणारी ही महत्वाची समस्या असते. पहिले ही समस्या सुटली की बाकी कामे सोयीस्कर होतील असे येथील नागरिकांनी ठरविले व त्यातूनच साकारली सांडपाणी नियोजनाची भुमिगत गटार योजना. भूमिगत गटार योजना व गावातील सिमेंटच्या रस्त्याची सगळी कामे गावाला मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून करण्यात आली. पैशाचा विनियोग व गावाचा विकास असा हा संगम आहे.

    गावातील भूमिगत गटारचे पाणी गावाबाहेर तीन हैदात एकत्रित करण्यात येते. ते तेथेच फिल्टर करुन जनावरांच्या पिण्यासाठी वापरण्यात येते. यामुळे जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. एवढेच नव्हे तर, लोकवर्गणी करुन पाणी साठविण्यासाठी शिवकालीन बंधारा बांधण्यात आला. प्रायोगिक तत्वावर शाळेच्या छतावर रेन वॉटर हार्व्हेस्टींग करण्यात आले. स्वच्छतेचे व विकासाचे महत्व जाणल्यानेच हे घडले. जिल्हास्तरावर प्रथम आल्याने नागरिकांचा उत्साह व्दिगुणीत झाला आहे.

    आता विभागीय स्पर्धेसाठी तयारी सुरु आहे. त्यासाठी गावकर्‍यांनी काही नवे संकल्प हाती घेतले आहेत. गावात मोकळया जागेत ऑक्सीजन पार्क उभारण्यात येणार आहे. शिक्षणाचा अधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गावातील एकही मुल शाळाबाह्य राहू नये यासाठी जून महिन्यात संपूर्ण गावकरी झटणार आहेत. प्रत्येक महिन्यात एक दिवस सर्व गावकरी मिळून सामूहिक स्वच्छता मोहीम राबविणार आहे. पावसाचा थेंब न थेंब अडविण्यासाठी नियोजन केले जाणार आहे.

    या सार्‍या योजना व कल्पना गट विकास अधिकारी मांडीवाले, सरपंच देशमुख व ग्रामसेवक गिर्‍हे यांनी आखल्या असून राहुडला मॉडेल व्हिलेज करण्याचा संकल्प केला आहे. शासन व प्रशासन एकत्रित आले तर कसा विकास साधला जातो हे पाहायचे असेल तर एकदा राहुडला भेट द्यावीच लागेल. गावच्या विकासात महिलांचे योगदान महत्वाचे असते. राहुड मध्येही महिला यात मागे नाहीत. कर्ते पुरुष कर्तव्यासाठी बाहेर गेल्यावर गाव स्वच्छ सुंदर ठेवण्याचं काम महिलाच करतात असे सरपंच अभिमानाने सांगतात. एकंदरित राहुडची वाटचाल स्वच्छतेकडून समृध्दीकडे होत असून राहुडचा आदर्श जिल्हयातील अनेक गावांनी घ्यावा असाच आहे.
    रवि गिते

    Sunday, May 23, 2010

    नागरिकांची सनद


    शासकीय योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीत लोकजागृतीला महत्वाचे स्थान आहे. लोकाभिमुख शासन व्यवस्थेचा कणा असलेल्या सामान्य नागरिकांना शासन आपल्यासाठी काय करते हे थेट त्यांच्यात जाऊन सांगितले तर शासनाप्रती नागरिकांची विश्वासार्हता वाढते. शासन नेहमीच लोककल्याणकारी योजना राबवीत असते परंतु त्या ज्यांच्यासाठी आहेत त्यांच्यापर्यत थेट पोहचत नाहीत असा सूर नेहमीच असतो. ही बाब ओळखून चिखली जिल्हा बुलडाणा येथील उपविभागीय अधिकारी वासंती माळी व तहसिलदार प्रा. संजय खडसे यांनी नागरिकांची सनद तयार केली आहे. वरवर पाहता ही केवळ पुस्तिका वाटत असली तरी या सनदेच्या माध्यमातुन तहसिल कार्यालयच नागरिकांपर्यंत नेण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.


    तहसिल कार्यालयात नागरिक दररोज आपल्या अनेक कामासाठी येत असतात. साध्या साध्या कागदासाठी नागरिकांना अनेक चकरा माराव्या लागतात. एवढे करुनही काम होईलच याची शाश्वती नसते. ही बाब तहसिदार खडसे यांनी वर्षभर अभ्यासली व त्यातूनच नागरिकांची सनद निर्माण झाली.


    शासकीय योजनांची मार्गदर्शक पुस्तिका असलेली ही सनद म्हणजे परिपूर्ण दस्ताऐवज म्हणावा लागेल. या मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये उत्पन्नाचे प्रमाणपत्र, हैसियत प्रमाणपत्र, शिधापत्रिका, वास्तवांचे प्रमाणपत्र, जन्ममृत्यु नोंद आदेश, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, हॉटेल परवाना मिळविण्यासाठीचा अर्ज, कार्यक्रम परवान्यासाठीचा अर्ज, संजय गांधी निराधारसाठीचा अर्ज, विधवा स्त्री साठीचे अनुदान, आदीबाबतचे अर्ज दिलेले आहेत. ही सर्व कागदपत्रे नागरिकांना तहसिल कार्यालयात एका तासात उपलब्ध करुन देण्याचा मानस खडसे यांनी बोलून दाखविला. नागरिकांची सनद पालकमंत्री मनोहर नाईक यांच्या उपस्थितीत नागरिकांना अर्पण करण्यात आली.


    प्रतिज्ञापत्रासाठी नागरिकांनी बर्‍याचदा जास्त पैसे मोजावे लागतात. ही बाब लक्षात घेता तहसिल कार्यालयाच्या वतीने अगदी माफक दरात प्रतिज्ञापत्र लिहून देण्याची सोयही केली जाणार आहे. प्रतिज्ञापत्रात मजकूर काय असावा याचा उल्लेख नागरिकाच्या सनदमध्ये असून नागरिकांनी स्वच्छ हस्ताक्षरात प्रतिज्ञापत्र लिहिल्यास वेंडरचा खर्चही वाचू शकतो. नागरिकांच्या सनदेचे दुसरे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी लागणार्‍या कागदपत्राचे नमुने यात समाविष्ट आहेत. या सगळया कागदपत्रांच्या नमुन्यांचे फ्लेक्स तयार करुन तहसिल कार्यालयात लावण्यात येणार आहेत. नागरिकाची ही सनद तालुक्यातील प्रत्येक तलाठयाकडे उपलब्ध करुन देण्याची योजना तहसिल कार्यालयाची असून ज्याद्वारे नागरिकांना दैनंदिन व्यवहारांच्या कागदपत्रांसाठी पायपीट करावी लागणार नाही.


    बारावी व दहावीचे निकाल लागल्यानंतर जातीचे प्रमाणपत्र व उत्पन्नाचे दाखल्यासाठी विद्यार्थ्याची मोठी गर्दी तहसिल कार्यालयात होणार आहे. हे दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थ्याना या सनदेचा खुप मोठा फायदा होणार आहे. तहसिलदार खडसे यांनी घरपोच जातीचे प्रमाणपत्र हा उपक्रम राबवून जवळपास एक हजार विद्यार्थ्याना जात प्रमाणपत्र वितरित केले आहेत. नागरिकांची सनद तयार करुन त्यांनी शासन आपल्या दारी हा उपक्रम खर्‍या अर्थाने राबविला आहे. नागरिकांनी या सनदेचा पुरेपुर फायदा घेतला तरच नागरिकांची सनद नागरिकांना पोहचली असे म्हणता येईल.
    रवि गिते

    Wednesday, May 19, 2010

    शासनाच्या योजना लोकराज्यच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवाव्यात - प्राजक्ता लवंगारे


    लोकराज्य सर्वदूर पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राबविण्यात आलेल्या लोकराज्य घरोघरी मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी बजावणार्‍या अधिकार्‍यांचा महासंचालक प्राजक्ता लवंगारे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.मंत्रालयातील मिनी थिएटर येथे दोन दिवस माहिती अधिकार्‍यांच्या बैठकीचे आयेजन करण्यात आले होते. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या संचालक, उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकार्‍यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

    यावेळी संचालक (माहिती) प्रल्हाद जाधव, संचालक (माहिती)(प्रशासन) श्रद्धा बेलसरे, संचालक नागपूर विभाग भि.म.कौसल आदी उपस्थित होते.एकूण वर्गणीदार या विभागस्तरीय गटामध्ये सर्वात जास्त वर्गणीदार करुन उद्दिष्ट पूर्ण करणारे पुणे विभागाचे उपसंचालक वसंत शिर्के, कोकण विभागाचे उपसंचालक देवेंद्र भुजबळ तसेच अमरावतीचे उपसंचालक बी.एन.गवारी, औरंगाबादचे प्रभारी संचालक तथा उपसंचालक लातूर प्रमोद गवळी यांचा यावेळी गौरव करण्यात आला.लोकराज्यच्या वर्गणीदारांचे उद्दिष्ट पूर्ण करणार्‍या १५ जिल्हा माहिती अधिकार्‍यांनाही यावेळी गौरविण्यात आले. त्यामध्ये विजय पवार (रायगड-अलिबाग ), संभाजी गायकवाड (सोलापूर), सखाराम माने (सातारा), किरण मोघे (नांदेड), राजेंद्र सरग (पुणे), अनिल गडेकर (अमरावती), अनिल आलुरकर (यवतमाळ), नितीन मोकळ (जालना), ज्ञानोबा ईगवे (बीड), रवी गिते (बुलडाणा), विवेक खडसे (अ.का.) (भंडारा), प्र.रा.मुराळकर (ठाणे), गोविंद अहंकारी (औरंगाबाद), चंद्रकांत क्षीरसागर (अ.का.) (गोंदिया) आणि अंबादास म्याकल (हिंगोली) यांचा समावेश आहे.

    तसेच संभाजी गायकवाड (सोलापूर), सखाराम माने (सातारा), म.ठ. गावित (जळगाव), डॉ.किरण मोघे (नांदेड), विवेक खडसे (अ.का.) (भंडारा), उत्तम मुंजाळे (अहमदनगर), दयानंद कांबळे (कोल्हापूर) आणि चंद्रकांत क्षीरसागर (गोंदिया) या १० पेक्षा जास्त गावे लोकराज्य ग्राम करणार्‍या अधिकार्‍यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

    तसेच लोकराज्य घरोघरी मोहीम राबविताना लोकराज्य शाळा हा उपक्रम राबविणारे बुलडाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. लोकराज्य वर्गणीदार मोहिमेचे हे सातत्य कायम ठेवून शासनाच्या योजना लोकराज्यच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांना महासंचालक प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी मार्गदर्शन केले. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

    Monday, April 26, 2010

    ब्रॅन्ड लोकराज्य आणि विद्यार्थीही..


    17 एप्रिल ची सकाळ वेळ ७ ची.. बुलडाणा जिल्हयातील विद्या विकास विद्यालय कोलवडच्या हिरवळीवर सगळे विद्यार्थी स्वच्छ गणवेशात हजर.. हातात पॅड व कंपास . . .. मुख्याध्यापक सुचना देत होते.. दीड तासाचा पेपर आहे. सर्व प्रश्न सोडवा.. अक्षर सुवाच्च काढा.. खोडतोड करु नका.. आणि सर्वात महत्वाच म्हणजे परीक्षा संपल्यानंतर प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक घरी न्या. ती जपून ठेवा आणि पुढील परिक्षेची तयारी करा.. निमित्त होते लोकराज्य सामान्य ज्ञान परीक्षेचेहे सगळ माझ्यासाठी नवीन तर होतच, त्याही पेक्षा अप्रुप वाटाव असच होत. परीक्षा म्हटल की विद्यार्थ्याच्या अंगावर काटा येतो पण महाराष्ट्रातील पहिल्या लोकराज्य शाळेने लोकराज्यवर आधारित सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करताच विद्यार्थी आनंदाने व स्वयंप्रेरणेने परिक्षेत सहभागी झाले. शाळेच्याच नाही तर लोकराज्यच्या इतिहासात ही अनोखी परिक्षा ठरावी. या शाळेतील ७०० विद्यार्थी लोकराज्यचे वर्गणीदार आहेत. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून अवांतर वाचणाची सवय लागावी व त्यांच्या बालवयापासून स्पर्धा परिक्षेचे संस्कार व्हावे हा या मागाचा हेतू आहे. विद्यार्थ्यांना केवळ वर्गणीदार करुन ही शाळा थांबली नाही तर विद्यार्थी लोकराज्य वाचतात का ? वाचतात तर जपून ठेवतात का ? याचा शोध घेण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुनील जवंजाळ यांनी दर तीन महिन्याला लोकराज्य अंकावर आधारित परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि या मोहिमेची पाहिली परीक्षा १७ एप्रिल २०१० रोजी घेण्यात आली. वरवर पाहता ही केवळ परीक्षा असली तरी विद्यार्थ्यांवर स्पर्धा परीक्षेचे संस्कार करण्याचा हा अभिनव असा उपक्रम आहे. स्पर्धा परीक्षेत मराठी टक्का वाढावा यासाठी शासन स्वत: पुढाकार घेत आहे. त्यासोबत लोकराज्यने प्रेरणा मंच स्थापन करुन स्पर्धा परीक्षा देणार्‍यांना प्रोत्साहन देण्याचे काम जबाबदारी समजून केले आहे. त्याच लोकराज्यवर आधारित ही परीक्षा घेण्याचा कोलवड शाळेचा उपक्रम म्हणजे नव्या पिढीवर प्रशासकीय संस्कार करणे असाच म्हणावा लागेल. मुख्याध्यापक व त्यांच्या सहकार्‍यांनी यासाठी ७५ गुणांची प्रश्नावली तयार केली होती. या प्रश्नावलीवर नजर टाकल्यास शालेय मुले एमपीएससीचा पेपर सोडवत असल्याचे जाणवते. नोव्हेबर २००९ ते मार्च २०१० या महिन्याच्या लोकराज्य अंकावर आधारित ७५ प्रश्न होते. पेपरला दीड तासाचा वेळ दिला असला तरी विद्यार्थ्यांनी तो केवळ ४५ मिनिटात सोडविला यावरुन विद्यार्थ्यांनी किती छान तयारी केली याची अनूभूती यावी. ही एकच परीक्षा घेऊन आम्ही थांबणार नाही तर दर तीन महिन्याला ही परीक्षा घेण्यात येणार असल्याचे शाळा व्यवस्थापकाने जाहिर केले. त्यामुळे विद्यार्थी जेव्हा १२ वी पास होवून बाहेर पडतील तेव्हा त्यांचेकडे लोकराज्यचे ८४अंक व १६०० प्रश्न इतका मोठा ठेवा असणार आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी शाळेतच झाली असल्याने त्यांना कुठलेही आव्हान पेलने कठीण जाणार नाही. यावर या शाळेच्या विद्यार्थीनी प्रियंका जाधव व कविता रिंढे यांच्या प्रतिक्रिया अत्यंत समर्पक आहे. ४५ लाख वाचक असलेले लोकराज्य शासनाच्या योजना व ध्येय धोरणांसोबतच स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त मार्गदर्शक आहे. आपली शाळा लोकराज्य शाळा असल्याचा अभिमान व्यक्त करुन आम्ही लोकराज्यच्या प्रत्येक परिक्षेत भरीव यश संपादन करु.लोकराज्य आम्हाला स्पर्धा परिक्षेचे दालन उघडून देत असल्याचा मनस्वी आनंद त्यांनी व्यक्त केला. मुलांमध्ये हा आशावाद लोकराज्यने निर्माण केला ही या उपक्रमाची अतिशय जमेची बाजू म्हणावी लागेल. एरवी परिक्षेचे टेंशन घेणारे विद्यार्थी लोकराज्य परिक्षेला मोठ्या उत्साहाने सामोरे गेले. त्यांचा अभ्यास व आनंद विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरुन ओसंडून वाहत होता. परिक्षा संपल्यावरही पुष्कळ वेळ विद्यार्थी शाळेच्या परिसरात घुटमळत होते. लोकराज्यचे अंक चाळून आपण लिहलेल्या उत्तराशी ताळमेळ लावत होते. त्यामुळे शाळेचा संपूर्ण परिसर लोकराज्यमय झाल्याचे वाटत होते. विद्या विकास विद्यालय ही नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारी शाळा आहे. विद्यार्थ्यांनी केलेला वृक्षसवर्धनाची गुणपत्रिकेवर नोंद घेणारी ही एकमेव शाळा असावी. शासनाचे ब्रॅन्ड म्हणून लोकराज्यकडे पाहिले जाते. या ब्रॅन्डचे प्रमोशन व्हावे व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने सुरु करण्यात आलेल्या परिक्षेत प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यास जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने एक हजार रुपयाचे परितोषिक देण्यात येणार आहे तर अनिल पळसकर व विजय इंगळे यांचेकडून ५०० व ३०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.विद्यार्थ्यावर वाचणाचे व परिक्षेचे सुसंस्कार करणार्‍या विद्या विकास विद्यालयातील विद्यार्थी खर्‍या अर्थाने लोकराज्यचे प्रमोटरच आहेत. या अनोख्या व अभिनव परिक्षेच्या मंत्रमुग्न वातावरणातून बाहेर पडू नये असेच वाटत होते. शाळांनी स्वस्फूर्तपणे हा उपक्रम राबविल्यास शाळेल जिवनापासूनच विद्यार्थ्यावर स्पर्धा परिक्षेचे संस्कार होतील हे निश्चित.
    रवि गिते

    Friday, April 2, 2010

    सर्व विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र - जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन


    भौगोलिकतेच्या आधारावर बुलडाणा जिल्हयाचे घाटावरील व घाटाखालील असे दोन भाग पडतात. त्यामुळे दोन्ही भागातील प्रश्न व समस्या वेगळया आहेत. पेयजल व सिंचनाच्या समस्यातही दोन भागात साम्य नाही. बुलडाणा शहराच्या पाण्याची समस्या त्यामुळेच तीव्र आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील सत्रात परीक्षा संपण्यापूर्वीच जातीचा दाखला घरपोच देण्याची योजना प्राधान्याने राबविण्यात येईल असा विश्वास बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ.रामास्वामी एन. यांनी महान्युजला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केला.दहावी बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी खूप धडपड करावी लागते. ब-याच वेळा जात प्रमाणपत्र नसल्यामुळे उच्च शिक्षणाला प्रवेश मिळत नाही. जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागणारी कागदपत्रे व पुरावे जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना खूप कष्ट उपसावे लागतात ही बाब लक्षात घेता आम्ही परीक्षा संपण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र घरपोच देण्याचा निर्णय घेतला. मुख्याध्यापकांमार्फत दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठीचे अर्ज वितरीत केले आणि त्यांच्याच मार्फत महसुल यंत्रणेने ही योजना राबविली . याला जिल्हयात चांगला प्रतिसाद मिळाला असून या सत्रात जिल्हाभरात अंदाजे सात हजार विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वितरीत केले. घरपोच जातीचा दाखला या योजनेमुळे परीक्षेनंतर होणारी धावपळ तर थाबलीच शिवाय पालकांची आर्थिक बचतही झाली आहे. पुढील सत्रात ही योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असून जिल्हयातील दहावी-बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना घरपोच जातीचा दाखला देण्याचा संकल्प असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी सांगितले.चिखली तालुक्यात खूप चांगले काम झाल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. या योजनेचा विद्यार्थी व पालकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी महान्युजच्या माध्यमातून नागरिकांना केले आहे. बुलडाणा शहरात असलेल्या भीषण पाणी टंचाईच्याविषयी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, ७ कोटीची पेनटाकळी संमातर पाईपलाईनचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून १० एप्रिल पासून बुलडाणा शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होईल. बुलडाणा शहराची भौगोलिक परिस्थिती पाहता या ठिकाणी कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना होणे गरजेचे आहे त्यादृष्टीने नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत ७५ कोटीच्या कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आला आहे. त्यास शासनाने तत्वत: मान्यता दिली असून १५ कोटी लोकवर्गणी भरण्याची हमी नगर पालिकेच्या वतीने देण्याची प्रतिक्षा आहे. या योजनेचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले असून दोन वर्षात ही योजना पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ही योजना पूर्ण होताच बुलडाणावासियांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. सध्या जिल्हयात २९ टँकर सुरु असून मागणी येताच टँकर पुरविण्याची प्रशासनाची तयारी आहे. जिल्हयातील १६६ गावे खारपाणीपट्टयात येत असून येथील समस्या थोडया वेगळया आहेत. त्यांची दखल शासनस्तरावर घेतल्या जात आहे. संत गजानन महाराज संजीवन शताब्दी समाधी सोहळयानिमित्त आयोजित महोत्सवासाठी ३५० कोटीच्या शेगाव विकास आराखडयास शासनाने मान्यता दिली असून ५२ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून रस्त्याच्या कामाच्या निविदा मागविल्या गेल्या आहे. तीन वर्ष चालणा-या या विकास आराखडयात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सुविधा, भक्त निवास, विश्रामगृह अशा अनेक कामाचा अंतर्भाव आहे. शेगांव येथे येणा-या भाविकांसाठी ११ कि.मी. अंतरावरून पाणी पुरवठा करण्यात येणार असून त्यासाठीचे काम प्रगतीपथावर आहे. महोत्सव सुरु होण्यापूर्वी भक्तांना पेयजल उपलब्ध केल्या जाईल, त्याचप्रमाणे परिक्रमामार्गही पूर्ण करण्यात येईल. टप्प्याटप्प्याने विकास होणार असला तरी आवश्यक कामे प्राधान्याने करण्याकडे समितीचा कल आहे. या संदर्भातील महत्वाची बैठक नुकतीच मुंबई येथे मुख्यमंत्री व पालकमंत्री यांचे उपस्थितीत घेण्यात आली. केवळ जिल्हावासियच नव्हे तर महाराष्ट्रभर महाराजांचे भक्त असून हा महोत्सव भव्य प्रमाणात व नियोजनबध्द पार पाडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. वन हक्क जमिनीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात जिल्हा अग्रेसर असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, अनुसूचित जमाती व इतर पांरपरिक वन निवासी यांना जमिनीचे पट्टे देण्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. २७७ वन हक्क जमिनीच्या दाव्यांना मंजूरी देण्यात आली असून जिल्हाभरातील २७७ लाभार्थ्यांना ४१७.५२ हेक्टर जमीनीचा हक्क प्रदान करण्यात आला. या कामाची प्रशंसा विभागीय आयुक्तांनी केली आहे. हे सगळे दावे वैयक्तिक स्वरूपाचे असून वन जमीनीवरील अतिक्रमित हक्काचे सामुहिक दावे नागरिकांनी ग्राम वन हक्क समितीकडे दाखल केल्यास त्यांचाही निपटारा तातडीने करण्यात येईल. शासनाच्या या कायद्यामुळे नागरिकांना खूप मोठा फायदा होणार असून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. जलपूर्ती विंधन विहीरीसाठी जिल्हयाला १६ हजार ९०० विहीरीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यापैकी ८ हजार लाभार्थ्यांची पहिली यादी ३ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार असून उर्वरीत लाभार्थ्यांची निवड १० एप्रिल पर्यत निश्चित करण्यात येणार आहे. जलपूर्ती धडक विंधन विहीरीमुळे सिंचन क्षेत्रात वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे. त्याचप्रमाणे शेततळयाचे उद्दीष्टही जिल्हयाने पूर्ण केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत प्रती तालुका २०० प्रमाणे २६०० शेततळी मंजूर करण्यात आली असून राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत १ हजार शेततळी मंजूर करण्यात आली आहे. जिल्हयात मोठया प्रमाणात शेततळे निर्माण झाल्यास पाण्याच्या पातळीत वाढ होऊन सिंचन क्षेत्र नक्कीच वाढेल. मानव विकास मिशन बाबत बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर व जळगांव जामोद हे दोन तालुके मिशन अंतर्गत येत असून या ठिकाणी मिशनचे कार्य चांगल्या प्रकारे झाले आहे विशेषत: या दोनही तालुक्यात आंगणवाडी इमातीचे १०० टक्के बांधकाम झाले आहे. त्याच प्रमाणे पाणलोट व आरोग्य सुविधेची कामे मोठया प्रमाणात करण्यात आली आहे. मधुमख्खी पालन व्यवसायास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून यातून लाभार्थ्यांना आर्थिक लाभ मिळत असल्याचे या ठिकाणी दिसून येते. ई गर्व्हनर्स प्रणालीमध्ये जिल्हयाने प्रगती केली असून १३ पैकी ११ तहसिल कार्यालये एम एस व्हॅन प्रणालीने जोडण्यात आली आहेत. तसेच जिल्हा मुख्यालयातील इतर सर्व कार्यालये वारलेस राहुटरने जोडण्यात येणार आहेत. यामुळे भूमि अभिलेख, परिवहन, मालमत्ता नोंदणी, कृषि, पोलीस, रोजगार व स्वयंरोजगार, कोषागारे, नगर पालिका, ग्रामपंचायात यांच्या कामात सुसूत्रता येऊन ते थेट मंत्रालयाशी जोडले जाणार आहे.

    Monday, March 15, 2010

    किटक यात्रा




    बोथा जंगलात भटंकतीला जाऊयात का अशी विचारणा करणारा दूरध्वनी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांचा आला. रविवार असल्यामुळे तात्काळ हो म्हणालो. सोबत किटक संशोधक प्रा.अलोक शेवडे आहेत, अशी पृष्टी त्यांनी जोडताच किटक संशोधनात दिवस व्यतीत होणार याची कल्पना आली. वनभ्रमंती किती सुखावह असते याचा पहिल्यांदा अनुभव घेतला. छान घनदाट हिरव्यागार वनश्रींनी नटलेले, काट्याकुट्यात, दगडधोंड्यात, वेड्यावाकड्या पाऊलवाटात हरवलेलं, गवत फुलांनी, लता-वेलींनी गजबजलेलं अस जंगल पाहलं की, आठवण होते ती वन्य प्राण्यांची. पण त्याहीपेक्षा किटकांचे विश्व अजब आहे, अनोखे आहे. प्रा.अलोक शेवडे सांगत होते. या किटक विश्वात भ्रमती करावी म्हणून निसर्ग नवलाई किटक यात्रा प्रारंभ केली अन् पाहता पाहता ४०० च्या वर किटकांनी या यात्रेत हजेरी लावली, इती प्रा.शेवडे.आपल्या छंदाला, मनस्वी स्वभावाला योग्य वळण दिलं तर त्यातून व्यासंग निर्माण होते व आपल्यातील संशोधक वृत्ती जागृत होऊ शकते. याचा उत्तम प्रत्यय बुलडाण्यातील एका इंग्रजी विषयाच्या प्राध्यापकाने आणून दिलाय. त्यांनी किटकांमध्ये सौंदर्य शोधलंय ... ! आणि ते कॅमे-यात बंदीस्त केलय. प्रा.अलोक शेवडे यांनी केवळ छंद म्हणून आजुबाजुला दिसणार्‍या किटकांचे फोटो टिपायला सुरुवात केली आणि आतापर्यंत जवळपास साडेचारशे पेक्षा जास्त किटकांचे दीड हजार छायाचित्र त्यांनी टिपली आहेत. केवळ पुस्तकी अभ्यासात न रमता सौंदर्यवादी दृष्टीकोन समोर ठेवून जोपासलेला हा छंद कोणालाही संशोधनाकडे नेऊ पाहतोय.या यात्रेत आम्ही असंख्य किटकांना भेटलो. किटकांचे वर्णन व त्यांचे गुणधर्म शेवडे इतक्या सहजतेने सांगतात की, तो किटक यांना रोज भेटतो असेच वाटते. किटकांच्या किती जाती असाव्या याचा अंदाज लावणे कठीणच. अनेक किटक त्यांनी नव्याने शोधून काढलेत आणि त्यांना लिलया कॅमेराबध्द केलं आहे. रॉबर, गोल्ड ग्रीन लिफ बीटस्, कंमाडो मॉथ, आशियाई जायंट स्पायडर, यलो बॅन्डेड सॉटिपिड, गॉगलधारी किटक, नाकतोडा, रेनबो ब्ल्यु हार्नेट अशा कितीतरी किटकांचे अप्रतिम छायाचित्र शेवडेंच्या संग्रहात आहेत.मोकळा वेळ मिळताच मी जंगलाची वाट धरतो व किटकांच्या सानिध्यात रमतो असे ते सांगतात तेव्हा किटकवेड्या माणसाच भावविश्व डोळ्यासमोर येते. एकाच प्रजातीमध्ये तीन रंगाचे नाकतोडे केवळ शेवडे यांच्याच संग्रहात सापडतात. लिफ हुडेड ग्रास हॉपर अर्थात शिरस्त्राणधारी नाकतोडा असे त्याचे नाव.मात्र त्याचे सुरेख छायाचित्र पाहताच पानावर खरोखरच शिरस्त्रान ठेवल्याचा भास होतो. ऐन २६ जानेवारीला त्यांनी तिरंगा रंगाचा नाकतोडा कॅमेर्‍यात बदीस्त केला आहे. तो पाहिल्यावर त्यांच्या कॅमेर्‍याचा हेवा वाटतो. प्रा.शेवडे प्रबोधन कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत. तसेच ते अमरावती बोर्डाचे पर्यावरण विषयाचे तज्ज्ञ साधन व्यक्ती आहे. आपले अध्यापन कार्य सांभाळून प्रा.शेवडे आपला फावला वेळ जंगल भ्रमंतीत व्यतीत करतात. निसर्गाशी मानवाचे असलेले नाते अधिक घट्ट करायचा ते मनस्वी तळमळीने प्रयत्न करतात. किटक मैत्री बरोबरच ते सर्पमित्र देखील आहेत. किटकांना तर ते आराध्य दैवतच मानतात. या बाबतीत त्यांचे मत अतिशय संवेदनशील व पर्यावरण पूरक आहे. वन्य पशू-पक्षी यांच्या बरोबरच किटकही समृध्द जंगलाचे निदर्शक आहेत व सूक्ष्म अन्न भक्ष्य म्हणून त्यांचे संवर्धन अत्यावश्यक आहे, असे ते मानतात.त्यांच्या संग्रही सध्या केवळ नाकतोड्यांचे जवळपास १०० प्रकार आहेत, यावरून त्यांच्या छंदिष्ट संशोधनाची चुणूक दिसते. भटकंती दरम्यान आढळलेला प्रत्येक लहान मोठा किटक त्यांनी आजवर कॅमेराबध्द केलाय. यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम थक्क करणारे आहेत. Insect Photography हे अवघड प्रकरण त्यांनी कसे पेलले याचे रोचक वर्णन ते आपल्या स्लाईड-शो-टॉक-शो मधून करतात तेव्हा किटकांचे रोमांचकारी विश्व उभे राहते. आपल्या सभोवतालचा प्रत्येक सूक्ष्मजीव अतिशय मनोवेधक असतो याचे प्रत्यंतर त्यांनी टिपलेल्या छायाचित्रांमधून आल्याशिवाय राहत नाही. या आपल्या कलेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्याचे मोलाचे कार्य ते करत आहेत. आपल्या प्रत्यक्ष कृतीतून निसर्ग संवर्धनाचे धडे देत असतांनाच लोकांच्या मनात सौंदर्यवादी दृष्टीकोन विकसित करण्याचे अतिशय मौलिक कार्य त्यांच्या हातून घडत आहे. या विषयाच्या अभ्यासकांनी एकवेळ त्यांच्या किटक संग्रहाला आवश्य भेट द्यावी. बोथा जंगलातील ही किटक यात्रा केव्हाच संपू नये असेच वाटत होते.
    रवि गिते

    Thursday, March 11, 2010

    नाव दगडवाडी हाती विकासाचा वाळा


    'गाव करी ते राव न करी' अशी आपल्याकडे म्हण आहे. दगडवाडीला भेट दिल्यानंतर ही म्हण त्याच गावासाठी तयार झाली असेल असे मनोमन वाटते. शासनाच्या योजना राबविण्यासाठीचा जो पुढाकार लागतो त्याचा पुरेपूर अनुभव या गावाला भेट दिल्यानंतर येतो. हागणदरीमुक्त गाव, तंटामुक्त गाव, वनग्राम, स्वच्छता ग्राम, आदर्श ग्राम, जलभूमि अभियान, पाणलोट विकास, बचतगट चळवळ अशा कितीतरी अंगाने या गावाची ओळख आहे.आता आदर्श कुटूंब अभियान राबवून दगडवाडीने सर्व योजनांच्या अंमलबजावणीचा ताळेबंदच जाहीर केला आहे. गावातील महिला व नागरिक ध्येयाने झपाटल्यानंतर गावचा कसा कायापालट होतो याचे उत्तम उदाहरण दगडवाडी आहे. नाव जरी दगडवाडी असले तरी गावकर्‍यांच्या हाती विकासाचाच वाळा आहे. दगडवाडी (रघुवीर वाडी) ता. देऊळगावराजा जि. बुलडाणा, या गावाने ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम, पाणलोट, तंटामुक्ती या क्षेत्रात भरीव काम केले आहे. आता 'आदर्श कुटूंब' हा अभिनव प्रयोग राबविला. गावातील नागरिकांनी स्वयंस्फुर्तपणे स्वच्छता चळवळ राबवावी हा या मागचा हेतू आहे. वरवर पाहता हे अभियान केवळ गावापूरते असले तरी या अभियानाने सरकारला एक सुंदर योजना दिली आहे. एरवी शासन जनतेला योजना देते प्रशासनाच्या माध्यमातून ती राबिविली जाते. मात्र दगडवाडी गावाने 'आदर्श कुटूंब' ही अभिनव योजना देतांना नागरिकांनी स्वयंप्रेरणेने केलेल्या कार्यामुळे गावाचा कसा कायापालट होतो हेही दाखवून दिले आहे. यासाठी गावकर्‍यांनी एक प्रश्नावली तयार केली व नागरिकांना वितरीत केली. ही प्रश्नावली म्हणजे या योजनेचा मसुदा ठरावा अशीच आहे. प्रश्नावलीत शासनाच्या ५ योजनांची अंमलबजावणी दडली आहे. शौचालय, सांडपाणी नियोजन, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण व तंटामुक्ती अशा पाच योजनांची स्वयंपूर्ण अंमलबजावणी म्हणजे 'आदर्श कुटूंब' योजना आहे. अशा स्वप्नाचा गावकर्‍यांनी राबविलेला हा राज्यातील एकमेव प्रयोग ठरावा. एवढेच नाहीतर घरपट्टी भरणार्‍या कुटूंबांनाच या योजनेत सहभागी होता येईल. याचा अर्थ ग्रामपंचायतीच्या उत्पनात भर व कर भरण्याची सवय लागते. यात सवय हा भाग अतिशय महत्वाचा आहे. कुठलीही योजना यशस्वी होण्यासाठी नागरिकांना चांगल्या कामाची सवय लागणे गरजेचे असते. आणि दगडवाडीच्या नागरिकांनी ही सवय स्वत:हून लावून घेण्याचा निर्धार केला आहे. हे या योजनेचे यश व महत्व अधोरेखित करते. आदर्श कुटूंब स्पर्धेत प्रथम येणार्‍या कुंटूबास ५ हजार रुपयांचे तर द्वितीय व तृतीय अनुक्रमे ३ हजार १ व २ हजार १ रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. रोख रकमेचा भाग प्रोत्साहित करण्यासाठी असला तरी त्यानिमित्ताने नागरिकांत परिवर्तनाची उमेद जागी होते हे विशेष. या स्पर्धेच्या बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आला. गावात पाय ठेवताच गावच्या समृध्दतेची जाणीव झाली. अतिशय नेटके व स्वच्छतेचा वसा घेणारे गाव म्हणून दगडवाडीचा परिसरात लैकिक आहे. त्याचबरोबर पाणलोट क्षेत्रात काम करणारे गाव म्हणूनही परिचित आहे. परंतू आज 'आदर्श कुटूंब' स्पर्धेच्या माध्यमातून या गावाने समाजापुढे आदर्श ठेवला आहे. या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेवरून नजर टाकल्यास अनेक योजनांची फलश्रुती असल्याचे जाणवते. यासाठी या गावचे सरपंच श्रावण डोईफोडे व गजानन घुगे याची कल्पकता व मेहनत महत्वाची आहे. यावर्षी सहदेव ओंकार घुगे, शंकर नामदेव जायभाये व त्र्यंबक जायभाये यांच्या कुटुंबांना आदर्श कुटुंब पुरस्कार मिळाला आहे. गावकर्‍यांनी गावकर्‍यांसाठी सुरु केलेल्या या अभिनव योजनेत नागरिकांनी स्वयंस्फुर्त सहभागी होणे व पुरस्कार प्राप्त करणे इतरांसाठी आदर्शच ठरले आहे. हे गाव एवढयावरच थांबले नाही. तर बचत गटाची मोठी फळी या गावाची जमेची बाजू आहे. गावात महिला व पुरुषांचे एकूण ३५ च्या वर बचत गट विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. यात सर्वात जास्त काम त्यांनी पाणलोट क्षेत्रात केले आहे. नागरिकांनी बचतगटाच्या माध्यमातून केलेल्या पाणलोटच्या कार्यामुळे २० द्राक्ष बागासह ४० फळबागा डौलाने अभ्या आहेत. पूर्वी सिंचनाच्या पाण्यासाठी भटकंती करणारे दगडवासिय आता बागा फुलवत आहेत. गावातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून पाणलोट विकासात खुप मोठी कामे केली आहेत, यामुळे पाण्याच्या पातळीत खूप मोठी वाढ झाली आहे. महिलांना प्रोत्साहन म्हणून गावात १२५ गॅस सिलेन्डरचे वाटप करण्यात आले. इंडोजर्मन प्रकल्पाच्यावतीने कुटूंबाला स्वच्छ पाणी मिळावे यासाठी गावात वाटर-फिल्टर पूरविण्यात आले. गावात राबविण्यात येत असलेल्या सर्व विकास कामांत व योजनांत महिलांचा सक्रीय सहभाग ही या गावाची दुसरी जमेची बाजू आहे. दुसरे म्हणजे नागरिकांच्या विकासांच्या कक्षा वाढाव्यात यासाठी इतर आदर्श गावांना सहली काढून तेथील विकास कामाची पाहणी करण्याचा उपक्रमही गावकरी नित्यनेमाने राबवित असतात. ही किमया एका दिवसाची निश्चितच नाही. या मागे गावकर्‍यांची मेहनत व एकी आहे. गावाचे नाव दगडवाडी असले तरी गावात विकासाचा झंझावात आहे. आता या गावाचे नाव जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात पोहचले आहे. दगडवाडीच्या 'आदर्श कुटूंब' उपक्रमाचे राज्यातील सर्वच गावांनी अनुकरण करायला काहीच हरकत नाही. 'जे जे (गावच्या विकासासंबधी) आपणाशी ठावे, ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन' या संत वचनाची अनुभूती दगडवाडीत आली.
    रवी गिते

    Tuesday, March 2, 2010

    दक्ष नागरिक अभियान राबविणार - डॉ. रविंद्र शिसवे


    जिल्हा पोलीस दलाला कुटुंबाचे स्वरुप देवून ,साधन सुचितेवर अपार श्रध्दा ठेवणा-या डॉ. रविंद्र शिसवे यांनी पोलीसांचे मनोबल उंचावले आहे. त्याचबरोबर. कर्तव्याला नैतिकतेचे अधिष्ठाण दिल्यास जनता व पोलीस यांच्यातील संबध व संवाद पसायदानासारखा होईल असा त्यांचा विश्वास आहे व त्या अनुषंगाने कामास सुरुवात केली असल्याचे त्यांनी महान्यूजला सांगितले.

    प्रश्न- जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेचा थोडक्यात आढावा कसा घ्यावा.

    उत्तर- २००९ साल हे निवडणूकीचे वर्ष असल्याने पोलीस दलाची ख-या अर्थाने परीक्षा होती. परंतु लोकसभा व त्या पाठोपाठ असलेल्या विधानसभा निवडणूकीत कायदा व सुव्यवस्था नीट हाताळण्यात जिल्हा पोलीस दलाला यश मिळाले . या निवडणूकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. त्यासोबतच गणेशोत्सव, नवरात्र, मोहरम, दिवाळी हे महत्वाचे उत्सव आलेत. आणि आताचा विदर्भ बंद या सगळया पार्श्वभुमीवर जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेला छेद देणारी कुठलीच घटना घडली नाही. सर्व शांततेत पार पडले. याचे श्रेय जिल्हयातील संयमी जनता व पोलीस दलातील अधिकारी कर्मचा-यांना आहे. पोलीस व जनता यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण झाल्यास प्रशासनाचे काम सोयीचे होते. आणि त्यावरच आमचा अधिक भर आहे.

    प्रश्न - पोलीस दलातील कामाचा वाढता ताण कमी करण्यासाठी काय नियोजन केले आहे.

    उत्तर- पोलीस दलात कामाच्या निश्चित वेळा नसतात तसेच कुठलीही घटना सांगून घडत नाही. मात्र नागरीकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे पोलीस दल सक्षम व प्रभावी असणे गरजेचे आहे. कामाचा ताण कमी करण्यासाठी नियोजन करावेच लागते. त्या अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांच्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यात येत आहे. पोलीस कुंटुंब मेळावा, क्रीडा स्पर्धा, सुप्त गुणांना वाव देणारे कार्यक्रमाचे पोलीस मुख्यालयात आयोजन करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे पोलीसांवरील ताण तर कमी होतोच त्याचबरोबर कम्युनिकेशन गॅपसुध्दा दूर होण्यास मदत झाली आहे. . सातत्याने येणारी नवनवीन आव्हाने व बदलती परिस्थती यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशिक्षण हा चांगला उपाय आहे. क्षमतावृध्दी व प्रशिक्षणामुळे सक्षम दल तयार होते. त्यादृष्ठीने कार्यक्रम राबविले जात आहेत. अशा कार्यक्रमामुळे पोलीसांत आपलेपणाची भावना निर्माण व्हायला मदत होते.

    प्रश्न- तंटामुक्ती ग्राम योजनेत जिल्हयाचा सहभाग वाढवा यासाठी काय उपाययोजना केल्या.

    उत्तर- यावर्षी पोलीस व महसुल विभागाने नियोजबध्द कार्यक्रम आखुन प्रत्येक गावात ही योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला आहे. त्यानुसार यावर्षी पंचविस टक्के गावे तंटामुक्त होतील असा विश्वास आहे. त्याचबरोबर वैयक्तिक तंटे व पारंपारीक तंटे मिटविण्यावर मोठया प्रमाणात भर दिल्या जात आहे. प्रत्येक गावात जनजागृती मोहीम तसेच नागरीक व यंत्रणा यांच्यात संवाद साधण्याचा प्रयत्न होत आहे. याचे सकारात्मक परीणाम लवकरच दिसुन येणार आहेत.

    प्रश्न- सिंधुदुर्ग जिल्हयात आपण अनेक नवीन उपक्रम राबविले आहेत या जिल्हयासाठी कुठला उपक्रम डोळ्यासमोर आहे.

    उत्तर- पोलीस दल व नागरीक यांच्या संयुक्त सहभागातुन कायदा व सुव्यस्था नियंत्रीत ठेवण्यासाठी दक्ष नागरीक अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस, जनता व प्रशासन यांच्या सक्रीय सहभागातुन हे अभियान राबविले जाणार आहे. पोलीस करत असलेल्या कामांचा प्रतिक्रिया ब-याच वेळा दृष्य स्वरुपात समोर येत नाही. या अभियानात नागरीकांचा सक्रीय सहभाग राहणार असल्यामुळे दृष्यस्वरुपात प्रतिक्रिया मिळणार आहे. शासनाच्या सर्व फोरमवरुन दक्ष नागरीक अभियान राबविण्याची संकल्पना आहे. कायदा व सुव्यवस्था यात नागरीकांचाही महत्वाचा सहभाग असुन या अभियानाच्या माध्यमातुन तो ठळकपणे अधोरेखित होणार आहे. त्या सोबतच पोलीस प्रशासनाच्या कामात सुसुत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.पोलीस विभाग हा जनतेच्या सेवेकरीता आहे. तो अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा यावर काम सुरु आहे. कार्यालयीन कामकाज संगणकीय करण्याची प्रक्रिया पोलीस मुख्यालयात सुरु झालेली आहे. पोलीस व जनता यांच्यात भितीचे नाही तर लोकसंवादाचे नाते निर्माण व्हावे यादृष्टीने सातत्याने प्रयत्न केले जाणार आहेत. या मोहिमेत जनतेनी स्वयंस्फूर्त सहभाग घेतल्यास दक्ष नागरिक अभियान निश्चित यशस्वी होईल.असा विश्वास वाटतो.

    Sunday, February 21, 2010

    एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही - सदानंद कोचे


    जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी सर्व सामान्य नागरिक मोठ्या अपेक्षा घेवून येत असतात. त्या सर्वांना विकासाच्या कक्षेत सामावून घेण्याचे कार्य जिल्हा परिषदेमार्फत होत असते. ग्राम स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम, सर्वशिक्षा अभियान, आरोग्य सेवा, तसेच बचत गटांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचा विकास करण्यावर जिल्हा परिषद सातत्याने भर देत असतात. या अनुषंगाने बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदानंद कोचे यांनी आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेला 'आभावाकडून प्रभावाकडे' नेले आहे. या विषयी त्यांनी महान्यूजशी केलेल्या संवादाचा संक्षिप्त आढावा...
    प्रश्न -आपण पदभार स्विकारल्यापासून केलेल्या महत्वपूर्ण कामाविषयी थोडक्यात काय सांगाल ?
    उत्तर - ऑगस्ट २००८ मध्ये रुजु झालो तेव्हा, जिल्हयाच्या सार्वजनिक स्वच्छतेचे कार्य १० टक्के होते. स्वच्छता हा नागरिकांच्या थेट आरोग्याशी संबंधीत विषय असल्याने यावर प्राधान्याने काम करुन ही टक्केवारी २६ टक्यावर पोहचली आहे. स्वच्छतेची कामे ४२ टक्याच्यावर करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेचा आहे. स्वच्छता व शिक्षण या दोन विषयावर लक्ष केंद्रीत करुन कामास सुरुवात केली. त्याचा सकारात्मक परिणाम लवकरच समोर येईल. जिल्हा परिषदेला आयएसओ करण्याच्या दृष्टीने पावले उचलली असून परिसर स्वच्छ त्याचप्रमाणे पारदर्शकता या बळावर जिल्हा परिषद लोकाभिमुख होताना दिसत आहे. जिल्हयातील सामान्य व गरजू विद्यार्थ्यांपर्यत शिक्षणाची गंगा पोहचविण्याचा मुख्य उद्देश आहे.
    प्रश्न - निर्मल ग्राम व स्वच्छता मोहिमेत आपल्या जिल्हयाची प्रगती कशी आहे ?
    उत्तर - निर्मल ग्राम योजनेत मागील काही वर्षात जिल्हयाने समाधानकारक प्रगती केली असून यावर्षी ११६ प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे निर्मल ग्राम ही संकल्पना लोकात रुजताना दिसत आहे. जोपर्यत नागरिकांचा सक्रीय सहभाग वाढत नाही तोपर्यत निर्मल ग्राम सारख्या महत्वाच्या योजनांचे यश अधोरेखीत होत नाही, मात्र समाधानाची बाब अशी की, बुलडाणा जिल्हयातील बहुतांश गावांना आपण या योजनेत सहभागी झालो पाहिजे. एवढेच नाही तर, पारितोषिकही मिळविले पाहिजे असे स्वयंत्स्फुर्तपणे वाटायला लागले आहे. स्वच्छता मोहिमेबाबत सांगायचे झाल्यास जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभाग प्रमुखांनी गावांना भेटी देवून पाहणी करावी असे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर आपण स्वत:ही अनेक गावांना भेटी देवून नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देतो.
    प्रश्न - आरोग्य व शिक्षणाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल थोडक्यात काय सांगाल ?
    उत्तर - आरोग्याच्या बाबतीत जिल्हयातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रसुती ही रुग्णालयातच व्हावी यावर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे. नागरिकांनी रुग्णालयात यावे असे असले तरी डॉक्टर नागरिकांच्या दारी या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा पोहचविण्याचे महत्वाचे काम जिल्हा परिषदेच्या मार्फत केल्या जात आहे. शिक्षण क्षेत्रात जिल्हा परिषदेचा सहभाग अतिशय महत्वाचा असतो. ग्रामीण भागात शिक्षकांनी मुख्यालयी तसेच शाळेत हजर राहावे अशा सूचना दिल्या नंतर त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळेच्या खोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच वाढताना दिसत आहे.
    प्रश्न - जलस्वराज्य व पाणी पुरवठा योजनेबाबत जिल्हा परिषदेने केलेले महत्वपूर्ण कार्य ?
    उत्तर - जिल्हयात ५४२ पाणी पुरवठा योजना आहेत. त्यातील ५० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित योजनांची कामे येत्या वर्षभरात करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न राहणार आहे. भारत निर्माण योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना पुर्णत्वास गेल्या असून ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेले सर्व प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यावर आपला भर राहणार आहे. इंदिरा आवास योजना व अल्पसंख्यांकासाठीची घरे पूर्ण करण्यात आली आहेत.
    प्रश्न - महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात आपले संकल्प काय ?
    उत्तर - महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त जिल्हा परिषदेने एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही असा संकल्प केला आहे. केवळ विद्यार्थीच नाही तर गाव-पाड्यातील कुठलाही मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी जिल्हा परिषदेतर्फे घेतली जाईल. त्याचबरोबर वृक्ष लागवड व संगोपणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येईल. यासाठी जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली आहे. बचत गटाचेही यासाठी सहकार्य घेतले जाईल. या संकल्पात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन आहे.
    ravi gite

    Tuesday, February 16, 2010

    लोकराज्य शाळा-एक संस्कार

    परवा बुलढाण्याला एका कार्यक्रमासाठी गेले होते. आमचे बुलढाण्याचे उत्साही जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते म्हणाले, आपण बुलढाण्यामध्ये एक लोकराज्य शाळा केली आहे. त्या शाळेला भेट देऊ या का? मी म्हटलं हो, नक्कीच, मीही या शाळेबद्दल खूप ऐकलं आहे. चला जाऊ या! बुलढाण्यातल्या कोलवड येथील विद्याविकास शाळेत आम्ही सकाळी पोहोचलो. शाळेचा मोठा हॉल आहे. या हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वच्छ गणवेशात ५ वी ते १० वी ची मुलं-मुली बसलेली होती. वातावरण अतिशय उत्साही होते. शाळेचे अध्यक्ष सुभाषराव पाटील यांनी आमचे स्वागत केले. माझ्या बरोबर नवाकाळच्या संपादक श्रीमती जयश्री खाडीलकर होत्या. अमरावती विभागाचे उपसंचालक बी. एन. गवारी हेही आले होते. शाळेचे मुख्याध्यापक सुनील जवंजाळ हिरीरीने माहिती देत होते. या शाळेत ऑडिओ व्हिडिओ व्यवस्था आहे. महत्वाचे विषय शिकविताना या माध्यमाचा वापर केला जातो. या शाळेत ८५० विद्यार्थी आहेत. शाळेच्या व्यवस्थापनाशी चर्चा करुन रवी गितेंनी सर्व विद्यार्थ्यांना लोकराज्यचे वर्गणीदार केले. घरोघरी लोकराज्य या मोहिमेत अधिकाधिक वर्गणीदार करण्यासाठी आम्ही सर्वच जण प्रयत्नशील असतो. लोकराज्यमधल्या माहितीचा सर्वात जास्त उपयोग स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना होतो. कुठल्याही स्पर्धा परीक्षेत शासनाच्या योजनांविषयी प्रश्न असतोच आणि त्या सर्व योजनांची माहिती फक्त लोकराज्यमध्ये असते. मला या शाळेचे फार कौतुक वाटते. विद्यार्थी घडवितांना फक्त घोकंपट्टी न करता त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल हे या शाळेत कटाक्षाने बघितले जाते. लोकराज्यचे अंक मुले वाचतात की नाही यावर शाळेत वर्षातून २ वेळा परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजे फक्त वर्गणीदार करणे हेच उद्दिष्ट नाही तर मुले अंक वाचतात का नाही याकडेही बघितले जाते. मी यावेळी मुलांना एक गोष्ट सांगितली. इंग्लंडमध्ये माझे एक स्नेही गेले होते. त्यांच्याकडून तिथल्या वाचनालयाचे एक पुस्तक हरवले. त्यांनी पुस्तकाची रक्कम वाचनालयाला देऊ केली. ग्रंथपाल म्हणाले, पुस्तक हरवले म्हणजे नेमके काय झाले? त्यावर ते म्हणाले, माझे पुस्तक प्रवासात चोरी गेले. बॅग चोरी गेली त्यात पुस्तक होते. ग्रंथपाल म्हणाले, आमच्या देशात जर कोणाला कुठल्याही वाचनालयाचे पुस्तक सापडले तर ते तो परत करतो. कुणीही आपल्याकडे वाचनालयाचे पुस्तक ठेवत नाही. माझ्या स्नेह्याचा यावर विश्वास बसला नाही. ग्रंथपाल म्हणाले, आठ दिवस वाट बघू या. तिसर्‍या दिवशी सकाळी ग्रंथपालांचा फोन आला की, पुस्तक परत आलेले आहे. मुलांनी वाचनावर प्रेम करावे आणि पुस्तकेही नीट वापरावीत. वाचनालयाची पुस्तके वेळेवर परत करावीत असा संस्कार माझ्या मनावर झाला. तो मी त्यांना सांगितला. रवी गिते यांच्यासारखे जिल्हा माहिती अधिकारी वेगळ्या प्रकारचे काम करतात आणि लोकराज्य वर्गणीदार वाढवित असतानाच नव्या पिढीवर संस्कारही करतात याचा मला विलक्षण आनंद होतो.
    श्रद्धा बेलसरे-खारकर